(Breaking update) चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोषचा उपचारादरम्यान मृत्यू; जागेच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा घेतला जीव
प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यातील मंदर येथे लहान भावाने मोठया भावावर चाकूने जीवघेणा हल्ला चढवून मांडीत चाकू भोकसल्याची घटना २१ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोठ्या भावाचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान रात्री १२ वाजता मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वडिलोपार्जित जागेच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा जीव घेतल्याने मंदर हे छोटेसे गाव हादरले आहे.
मंदर हे शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावातील लोक गुण्यागोविंदाने नांदतात. या गावात अनेक सदन शेतकरी आहेत. बुरडकर कुटुंबही या गावात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. मारोती बुरडकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे दोन मुलं संतोष आणि रविंद्र गावातच स्थायिक झाले. संतोष आणि रविंद्र यांची आई देखील गावातच राहते. संतोष यांना एक मुलगी व दोन मुलं आहेत. तर रविंद्र यांना तीन मुली आहेत. वडिलोपार्जित जागेवरून या दोन भावांमध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. गावातील तंटामुक्ती समितीनेही या दोन्ही भावांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यातील भांडणं संपली नाही.
दोन्ही सख्खे भाऊ वडिलोपार्जित संपत्तीसाठी एकमेकांचे पक्के वैरी झाले. दरम्यान याच कारणावरून २१ सप्टेंबरच्या रात्री त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. दोन्ही भावांत कडाक्याचे भांडण झाले. त्यांच्यातील हा वाद नंतर विकोपाला गेला आणि वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले. काही क्षणातच या वादाने हिंसक वळण घेतले. संतापाच्या भरात लहान भावाने थेट मोठ्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला चढविला. त्याने चाकू पोटात भोकसण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत चाकूचा घाव मांडीवर बसला. मांडीत चाकू भोकसल्याने संतोष बुरडकर हे रक्तबंबाळ झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.
चंद्रपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रात्रीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मांडीवर जोरदार घाव घातल्याने मांडीच्या नसा देखील फाटल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे वेदना असह्य झाल्याने त्यांनी काही वेळातच जीव सोडला. जागेवरून सुरु असलेल्या वादाने अखेर जीव घेतल्याच्या भावुक व तेवढ्याच संतापजनक प्रतिक्रिया मंदर या गावातून व्यक्त होत आहेत. वडिलोपार्जित जागेच्या वादातून भावानेच भावाचा खून केल्याने मंदर हे छोटंसं गाव हादरलं आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून संपत्तीच्या वादात संतोषचा नाहक बळी गेल्याने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी रविंद्र बुरडकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आधी दाखल केलेल्या गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

No comments: