प्रशांत चंदनखेडे वणी :-
दोन सख्ख्या भावांमध्ये सुरु असलेल्या घरगुती वादाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात झाले. लहाने भावाने मोठ्या भावावर चाकूने वार केल्याने मोठा भाऊ गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना वणी तालुक्यातील मंदर गावात २१ सप्टेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मोठ्या भावाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
मंदर गावात परिवारासह राहत असलेल्या संतोष मारोती बुरडकर वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे व रविंद्र मारोती बुरडकर वय अंदाजे ५३ ते ५८ वर्षे या दोन सख्ख्या भावांत वडिलोपार्जित जागेवरून वाद सुरु असल्याचे सांगण्यात येते. याच कारणावरून आज रात्री या दोन भावांत वाद उफाळून आला. वाद विकोपाला जाऊन लहान भावाने मोठ्या भावावर थेट चाकूने हल्ला चढवला. त्याने चाकूने केलेला वार मांडीवर बसला. रविंद्रने मोठ्या भावाच्या मांडीत चाकू भोकसून घाव घातल्याने संतोष बुरडकर हे गंभीर जखमी झाले आहेत. संतोषवर रविंद्र याने चाकूने हल्ला केला तेंव्हा संतोषचा मुलगाही घरीच असल्याचे सांगण्यात येते. रविंद्रने मोठ्या भावाच्या पोटात चाकू भोकसण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या भावाने वार चुकविण्याचा प्रयत्न केल्याने चाकूचा वार मांडीवर बसल्याची चर्चा गावातून ऐकायला मिळत आहे.
चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या संतोषला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र घाव गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. वडिलोपार्जित जागेवरून सुरु असलेल्या वादाने हिंसक वळण घेत लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने वार केल्याने गावात एकच चर्चा रंगली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. ही बातमी प्राथमिक माहितीच्या आधारावर घेण्यात आली असून पोलीस तपासात वेगळे काही निष्पन्न झाल्यास तसे वृत्त वाचकांपर्यंत पोहचविण्यात येईल.

No comments: