Latest News

Latest News
Loading...

दारूच्या नशेत पतीचा थरारक कारनामा; पत्नीला स्लॅबवरून ढकलले, सासूलाही दिला धक्का


प्रशांत चंदनखेडे वणी :-

दारूच्या नशेत घरी आलेल्या जावयाने पत्नीला घराच्या स्लॅबवर बोलावून घेतल्यानंतर तिला खाली ढकलल्याची धक्कादायक घटना चिंचोली येथे १८ सप्टेंबरच्या रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. मुलीला वाचविण्यासाठी धावलेल्या सासूलाही जावयाने धक्का दिल्याने तीही खाली पडून जखमी झाली. सुदैवाने दोघींनाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे कौटुंबिक वादाने धोकादायक वळण घेतल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी सुधाकर बापुजी मारबते (६५), रा. चिंचोली, ता. वणी यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी जबानी रिपोर्ट दिला. त्यांच्या रिपोर्टनुसार, त्यांची मुलगी चांदनी हिचे नऊ वर्षांपूर्वी उकणी येथील राजकुमार श्रीकृष्ण बावणे (३६) याच्याशी लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. पतीकडून होत असलेल्या त्रासामुळे चांदनी मागील दोन वर्षांपासून वडिलांकडे चिंचोली येथे राहत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

१८ सप्टेंबर रोजी रात्री कुटुंबीय झोपले असताना राजकुमार बावणे हा दारूच्या नशेत घरी आला आणि दरवाजा वाजवू लागला. मुलगी चांदनीने दरवाजा उघडल्यानंतर काही वेळ ती त्याच्याशी बोलत होती. त्यानंतर राजकुमार हा घराच्या स्लॅबवर गेला आणि पत्नीला वर बोलावले. त्यामुळे चांदनीही त्याच्यामागे स्लॅबवर गेली.

काही मिनिटांतच मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने चांदनीची आई चंद्रकला सुधाकर मारबते या धावत स्लॅबवर गेल्या. त्यांच्यामागे सुधाकर मारबतेही गेले. त्यावेळी राजकुमारने चांदनीला स्लॅबवरून खाली ढकलल्याचे त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे.

मुलीला ढकलल्यानंतर राजकुमारने सासू चंद्रकला यांनाही धक्का दिला. त्यामुळे त्या खाली पडल्या. घटनेनंतर सुधाकर मारबते यांनी घरच्या मागील बाजूने जाऊन पाहिले असता चांदनीच्या डाव्या हाताला मार लागल्याचे दिसून आले. तर चंद्रकला यांच्या पाठीला दुखापत झाली असून ओठ व डोक्यालाही मार लागल्याचे रिपोर्टमध्ये नमूद आहे.

मुलगी आणि पत्नी खाली पडल्यानंतर राजकुमारने त्यांना मारण्याची धमकी देत तो तेथून निघून गेला. मुलीला सासरी का पाठवत नाही, या कारणावरून जावयाने हा प्रकार केल्याचा आरोप सुधाकर मारबते यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

घटनेनंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी बीएनएसच्या कलम ११७(२), ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.

दारूच्या नशेत कौटुंबिक वादातून पत्नी व सासूला घराच्या उंचीवरून खाली ढकलण्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने दोघींना गंभीर दुखापत झाली नसली तरी किरकोळ वादातून हिंसक प्रकार किती टोकाला जाऊ शकतो, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

No comments:

Powered by Blogger.