Latest News

Latest News
Loading...

भाजप वणी शहरातर्फे ‘तान्हा पोळा सजावट स्पर्धा २०२६’; आकर्षक बक्षिसांची लयलूट

प्रशांत चंदनखेडे वणी :-

पारंपरिक पोळा सणाची संस्कृती, बैलांविषयीचा स्नेह आणि पर्यावरणपूरक सजावटीचा संदेश बालमनात रुजविण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने ‘तान्हा पोळा सजावट स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम (मोठा हनुमान मंदिराजवळ) वणी येथे ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून, वणी शहरातील बालगोपालांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दोन गटांत रंगणार स्पर्धा
स्पर्धेसाठी दोन वयोगट निश्चित करण्यात आले आहेत. ‘अ’ गटात १ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश असून प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीय ३ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.

तर ‘ब’ गटात ६ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश असून प्रथम क्रमांक ४ हजार, द्वितीय ३ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक गटात १ हजार रुपयांची तीन प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभागी बालगोपालांनाही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

‘स्वदेशी आणि पर्यावरणपूरक सजावटी’ला प्राधान्य
स्पर्धेतील सजावट पर्यावरणपूरक तसेच स्वदेशी वस्तूंच्या माध्यमातून करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे बालगोपाळांच्या कल्पकतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार आहे.
स्पर्धकांनी ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून, स्पर्धेच्या वेळेच्या किमान दहा मिनिटे आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

बालगोपाळांच्या कलागुणांना प्रोत्साहन
या उपक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक सणाची नाळ नव्या पिढीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बालवयातच सर्जनशीलता, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेचे मुख्य संयोजक भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवि बेलूरकर असून नीता पिदूरकर, वैशाली वातिले, प्रतिभा मंथनवार, विलास डवरे, मयूर गोयनका आणि नितीन बिहारी हे सहसंयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

पालकांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धेत सहभागी करून त्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि भाजप वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.