आईच्या कष्टांना हेमंतच्या जिद्दीची जोड! मारेगावच्या हेमंत बुजाडेंचा प्रेरणादायी प्रवास; सिद्धार्थ वसतिगृहातर्फे सत्कार
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करणारे मारेगाव येथील हेमंत बुजाडे यांचा सिद्धार्थ वसतिगृह, वणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाच्या प्रवासाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर संघर्षातून यश मिळविण्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला एस. एस. सोनारखन, नवनाथ नगराळे, प्रा. बाळासाहेब राजूरकर आणि जगदीश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. पाटील, प्रा. सोनारखन व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व पुस्तक देऊन हेमंत बुजाडे यांचा गौरव केला.
हेमंत यांचा यूपीएससीपर्यंतचा प्रवास सहज नव्हता. वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. मजुरी करून आईने मुलाच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. शिक्षणात खंड पडू नये म्हणून तिने परिस्थितीशी दोन हात केले. आईच्या या संघर्षाची जाणीव ठेवत हेमंत यांनीही शिक्षण घेत असताना कामे करून आपल्या शैक्षणिक गरजा भागविल्या.
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. परिस्थितीला दोष देण्याऐवजी त्यातूनच प्रेरणा घेत त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. अखेर कठोर परिश्रमाच्या बळावर यूपीएससीसारख्या देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश मिळवत त्यांनी आपल्या संघर्षाला सार्थ ठरविले.
सत्काराला उत्तर देताना हेमंत बुजाडे यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश मिळविणे शक्य आहे, असे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करावेत. अभ्यासात सातत्य ठेवले तर यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेतही ग्रामीण भागातील विद्यार्थी यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे सोनारखन व प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी हेमंत यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या संघर्षातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी हेमंत यांच्या प्रवासाचे कौतुक केले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी हेमंत यांचा आदर्श समोर ठेवून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ नगराळे यांनी केले. तर संचालन व आभार प्रदर्शन मंगल तेलंग यांनी केले.
आईच्या कष्टांचे चीज झाले!
आईने मजुरी केली, मुलाने अभ्यास केला; परिस्थितीने अडवले, पण हेमंत थांबले नाहीत... आणि अखेर यूपीएससीच्या निकालाने आईच्या प्रत्येक कष्टाचे चीज केले. हेमंत बुजाडे यांचा हा प्रवास केवळ एका विद्यार्थ्याच्या यशाची कहाणी नसून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याची प्रेरणादायी गाथा ठरली आहे.

No comments: