Latest News

Latest News
Loading...

भांदेवाडा जिओ टॉवर मधील चोरीचा डीबी पथकाने लावला छडा

प्रशांत चंदनखेडे वणी :-

भांदेवाडा परिसरातील जिओ टॉवरमधून डिझेल आणि बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा डीबी पथकाने कसोशीने शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी चोरीची बॅटरी, डिझेल विक्रीतून मिळालेली रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भांदेवाडा येथील जिओ टॉवरमधील डिझेल व बॅटरी चोरीला गेल्याची तक्रार २६ जुलै २०२६ रोजी वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. चोरीचा तपास सुरू झाल्यानंतर डीबी पथकाने आरोपींचा माग काढण्यासाठी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी पोउपनि साजीद सैय्यद आणि डीबी पथक वणी पोलीस ठाणे परिसरात आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून या चोरीसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली. राजूर कॉलरी येथील अरशील अकील शेख (२५) आणि अयान शादीक शेख (२१) यांचा चोरीत सहभाग असल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ हालचाली सुरू केल्या.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून डीबी पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्यांनी भांदेवाडा परिसरातील जिओ टॉवरमधून डिझेल व बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली.

चोरी केलेले डिझेल आरोपींनी महामार्गावरील वाहनचालकांना विकले असून डिझेल विक्रीतून त्यांना ११ हजार ५०० रुपये मिळाल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून १० हजार रुपये किमतीची बॅटरी, डिझेल विक्रीतून मिळालेले ११ हजार ५०० रुपये आणि चोरीसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच ३४ जे ५७९१) किंमत १० हजार रुपये, असा एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सातत्याने माहिती संकलित करत आरोपींपर्यंत पोहोचणे आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे, या कारवाईत डीबी पथकाची भूमिका निर्णायक ठरली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईमुळे भांदेवाडा जिओ टॉवर चोरी प्रकरणाचा छडा लागला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात डीबी पथक प्रमुख पोउपनि साजीद सैय्यद, पोहेकॉ गजानन सावसाकडे, पोका रितेश भोयर, गणेश मेश्राम, मोनेश्वर खंडरे व नंदकुमार पुप्पलवार यांच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.