Latest News

Latest News
Loading...

मारेगावात महावितरणच्या आढावा बैठकीत वीजप्रश्नांवर मंथन

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वीजविषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी मारेगाव येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. सोलर कृषी पंपाचे प्रलंबित अर्ज, जुन्या डिमांडची रक्कम, स्मार्ट मीटर, कृषी वीजजोडण्या आणि घरगुती वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आमदार संजय देरकर यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत प्रलंबित बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत शेतकऱ्यांनी सोलर कृषी पंपाच्या प्रलंबित अर्जांचा मुद्दा उपस्थित केला. मारेगाव तालुक्यात मोठ्या संख्येने अर्ज करूनही संबंधित एजन्सीकडून पंप उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी मांडल्या. निर्धारित कालावधीत पंप उपलब्ध न झाल्यास संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना आतापर्यंत किती एजन्सींवर कारवाई करण्यात आली, अशी विचारणा आमदार संजय देरकर यांनी केली. यावर कोणत्याही एजन्सीवर दंडात्मक कारवाई झालेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जुन्या डिमांडची रक्कम परत कधी?

कृषी वीजपंपासाठी पूर्वी डिमांड भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना नंतर सोलर पंप घेण्यास सांगण्यात आले. मात्र, आधी भरलेली डिमांडची रक्कम अद्याप परत मिळाली नसल्याची बाबही बैठकीत पुढे आली. शेतकऱ्यांची आर्थिक अडवणूक होऊ नये आणि संबंधित रकमेबाबत योग्य कार्यवाही करावी, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

स्मार्ट मीटरवरही प्रश्नचिन्ह

स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरूनही नागरिकांनी आपली भूमिका मांडली. स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक नसल्याचे सांगितले जात असताना महावितरणकडे अन्य प्रकारचे मीटर उपलब्ध नसल्याने ग्राहकांसमोर स्मार्ट मीटर बसविण्याशिवाय पर्याय राहत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. याबाबतही अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली.

याशिवाय प्रलंबित वीज जोडण्या, कृषी पंपांचा वीजपुरवठा, घरगुती ग्राहकांच्या समस्या आणि तालुक्यातील इतर वीजविषयक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी थेट आपल्या अडचणी मांडल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर विविध प्रलंबित प्रश्न स्पष्टपणे आले.

आमदार संजय देरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मोठ्या स्वरूपाच्या समस्यांनाही प्राधान्याने हाताळण्याचे निर्देश देण्यात आले. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा पुढील महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीला महावितरणचे पांढरकवडा कार्यकारी अभियंता संजय खंगार, उपअभियंता संतोष लोहे, कनिष्ठ अभियंता निलेश काकडे, कनिष्ठ अभियंता ज्युही वाघमारे, सहाय्यक अभियंता अतुल आत्राम, मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनीष मस्की, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल दरेकर, तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, शहर प्रमुख अभय चौधरी, संपर्कप्रमुख सचिन पचारे, देवा बोबडे, युवा सेना तालुका प्रमुख करण किंगरे यांच्यासह महावितरणचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.