कोणताही आर्थिक व्यवहार केला नसतानाही सेवानिवृत्त शिक्षकाच्या दोन बँक खात्यांतून तब्बल ३ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आल्याची धक्कादायक घटना वणी येथे समोर आली आहे. मोबाईलवर एकापाठोपाठ आलेल्या बँक व्यवहाराच्या संदेशांनंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दिलीप रतनलाल कोचेटा (वय ६८, रा. नटराज चौक, वणी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दिलीप कोचेटा हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र, वणी शाखेत दोन बँक खाती आहेत. २९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर खात्यातून रक्कम वजा झाल्याचा संदेश आला.
पहिल्या खात्यातून १ लाख ९५ हजार रुपये, तर त्यानंतर दुसऱ्या खात्यातून १ लाख ६८ हजार रुपये वजा झाल्याचे संदेश त्यांना प्राप्त झाले. अशाप्रकारे अवघ्या काही वेळात त्यांच्या दोन्ही खात्यांतून एकूण ३ लाख ६३ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले.
विशेष म्हणजे, कोणताही ऑनलाइन आर्थिक व्यवहार केलेला नसतांनाही दोन्ही बँक खात्यातून मोठी रक्कम वजा झाल्याचे कोचेटा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे अज्ञात भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर कोचेटा यांना सायबर फ्रॉड झाल्याचा संशय आल्याने त्यांनी यासंदर्भात तत्काळ ऑनलाइन तक्रार नोंदविली. त्यानंतर त्यांनी १६ सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून जबानी रिपोर्ट दाखल केला.
बँक खात्यातील रक्कम कोणताही व्यवहार न करता परस्पर वळती झाल्याने या घटनेने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईलवर येणारे संशयास्पद संदेश, लिंक, ओटीपी तसेच अनोळखी व्यक्तींचे कॉल याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
या प्रकरणात रक्कम नेमकी कोणत्या माध्यमातून वळती करण्यात आली, व्यवहार कोणत्या खात्यावर किंवा माध्यमावर झाला आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत ६६(C), ६६(ड) व बीएनएसच्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No comments: