Latest News

Latest News
Loading...

वर्धा नदीत उडी घेतलेल्या युवकाचा आढळला मृतदेह


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वर्धा नदीच्या जुनाड पुलावरून नदीत उडी घेतलेल्या युवकाचा गुरुवार १७ सप्टेंबरला सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास नदीपात्रात मृतदेह आढळून आला. १५ सप्टेंबरला रात्री ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास युवकाची मोटारसायकल व चप्पल जुनाड पुलावर आढळून आल्यानंतर त्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र १६ सप्टेंबरला दिवसभर नदीपात्रात शोध मोहीम राबवूनही युवकाचा शोध लागला नव्हता. परंतु आज नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. सतिश पांडुरंग पारशिवे वय ३५ वर्षे रा. उकणी ता. वणी असे या वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

उकणी येथे परिवारासह राहत असलेला हा युवक १५ सप्टेंबरला रात्री घराबाहेर पडल्यानंतर ८ ते ८.३० वाजता वर्धा नदीच्या जुनाड पुलावर त्याची मोटारसायकल व चप्पल आढळून आली. त्यामुळे त्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा दाट संशय निर्माण झाला होता. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर १६ सप्टेंबरला बचाव पथकाला पाचारण करून बोटीच्या साहाय्याने त्याचा नदीपात्रात दूरदूरपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. 

गुरुवारी सकाळी उकणी गावातील काही लोक वर्धा नदीत आंघोळ करण्याकरिता गेले असता त्यांना नदीत मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहत असतांना गावकऱ्यांनी नदीच्या काठावरून मृतदेह वाहत असलेल्या दिशेने पुढे जात पिंपरी (देशमुख) गावाजवळील वरारकर यांच्या शेतीजवळ वाहत आलेला मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. दोन दिवसानंतर नदीपात्रात सतिशचा मृतदेह आढळून आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा संशय अखेर खरा ठरला. 

सतिशने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या आत्महत्या करण्याने मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले आहे. त्याने कुठल्या विवंचनेतून आत्महत्या केली याचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.