शहरात गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने केलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली. जैन स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या नीलकंठ-मालती अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेले मेडिकल व्यावसायिक रवींद्र दामोदर येरणे यांच्या फ्लॅटवर सकाळी सुमारे ६ वाजता ईडीचे पथक दाखल झाले. त्यानंतर सुरू झालेली कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी सात तासांहून अधिक काळ सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ईडीचे अधिकारी दोन इनोव्हा वाहनांतून अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. पथकात महिला अधिकारी तसेच सशस्त्र सुरक्षा जवानांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाई सुरू झाल्यानंतर अपार्टमेंट परिसरासह संपूर्ण शहरात ही कारवाई औत्सुक्याची ठरली असून तालुकास्तरावर अशा प्रकारची कारवाई झाल्याने नागरिक अवाक झाले आहेत. सकाळपासून या कारवाईची शहरभर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेशी संबंधित कथित २४२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई होत असल्याची माहिती समोर येत आहे. या बँकेच्या कर्जवाटप व कथित गैरव्यवहारासंदर्भात विशेष लेखापरीक्षणानंतर विविध प्रकरणे नोंदविण्यात आली होती. २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज आणि कथित गैरव्यवहाराचा उल्लेख करण्यात आला होता.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील औषधी विक्रेते रवींद्र येरणे यांच्यावर झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी बाबाजी दाते महिला सहकारी बँकेशी संबंधित धनशोधनाच्या तपासात यवतमाळ जिल्ह्यात सुमारे नऊ ठिकाणी एकाचवेळी झडतीची कारवाई केल्याची माहिती पुढे आली आहे. ही कारवाई पीएमएलएअंतर्गत सुरू असल्याचे वृत्त आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी ईडीची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत असून, वणी, पुसद आणि यवतमाळ येथेही पथके पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या सर्व ठिकाणच्या कारवायांचा नेमका परस्पर संबंध, संबंधित व्यक्तींची भूमिका किंवा तपासाचा आवाका याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
वणीतील येरणे यांच्या निवासस्थानी तपासणीदरम्यान नेमकी कोणती कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी अथवा अन्य साहित्य तपासण्यात आले, तसेच काही वस्तू किंवा कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली अथवा जप्त करण्यात आली का, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
वणी शहरात ईडीची कारवाई झाल्याची माहिती समोर येताच शहरात चर्चांना उधाण आले आहे. सकाळपासून अपार्टमेंट परिसरात अधिकारी आणि सुरक्षा जवानांची उपस्थिती असल्याने नागरिकांचे लक्ष या कारवाईकडे लागले असून या कारवाईतून काय निष्पन्न होते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, कारवाई म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी असल्याचे सिद्ध होत नाही. तर ईडीच्या तपासातून कोणते तथ्य समोर येते आणि पुढील कारवाई काय होते, हे तपास यंत्रणेची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी संबंधित व्यक्तीविषयी कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.

No comments: