राजूर (कॉलरी) येथील युवकांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक व्यायामशाळेची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली असून, जिममधील महत्त्वाचे व्यायाम साहित्य नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. इमारतीचीही अवस्था खराब झाल्याने युवकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेली ही सुविधा सध्या कुचकामी ठरत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.
यासंदर्भात युवासेना (उबाठा) राजूर शाखाप्रमुख अमृत फुलझेले यांनी ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन जिमची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, राजूर (कॉलरी) गावातील युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक व्यायामशाळेतील डंबेल्स, ट्रेडमिल, वेट मशीन यासह विविध साहित्य मागील पाच वर्षांपासून खराब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जिमची इमारतही मोडकळीस आल्याने युवकांना व्यायाम करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
व्यायामाचे साहित्य खराब असल्याने युवकांना नियमित व्यायाम करता येत नाही. नादुरुस्त साहित्य वापरताना दुखापत होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, शासकीय निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले साहित्य वापराअभावी अडगळीत पडल्याने सार्वजनिक पैशातून उभारलेल्या सुविधेचा अपेक्षित लाभ युवकांना मिळत नसल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने जिममधील साहित्याची तातडीने पाहणी करून नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती करावी किंवा आवश्यकतेनुसार नवीन साहित्य उपलब्ध करून द्यावे, तसेच इमारतीचीही आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
युवकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या सुविधेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी अमृत फुलझेले यांनी केली आहे. मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास युवासेनेच्या माध्यमातून गावातील युवकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
राजूर कॉलरीतील सार्वजनिक जिमची दुरवस्था दूर करून ती पुन्हा युवकांच्या उपयोगात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे युवकांचे लक्ष लागले आहे.

No comments: