Latest News

Latest News
Loading...

गांधींच्या अहिंसेचा विचार, शास्त्रीजींच्या राष्ट्रनिष्ठेचा जागर


प्रशांत चंदनखेडे वणी :-

सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग दाखविणारे महात्मा गांधी, तर साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श निर्माण करणारे लालबहादूर शास्त्री हे आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. गांधीजींचे विचार केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर संपूर्ण जगाने त्यांना स्वीकारले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात शांतता, बंधुभाव आणि मानवतेची भावना दृढ करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केले.

वणीतील गांधी चौक आणि शास्त्रीनगर येथे गांधी-शास्त्री जयंती तसेच जागतिक अहिंसा दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अतुलनीय आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या लढ्यापलीकडे जाऊन त्यांनी मानवकल्याणासाठी केलेले कार्य अधिक व्यापक असल्याचे खाडे यांनी नमूद केले. गांधी जयंतीनिमित्त जगभरात अहिंसा दिन साजरा केला जातो, हीच त्यांच्या विचारांची जागतिक स्वीकारार्हता असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सत्य आणि अहिंसा’ हा गांधीजींचा विचार आणि ‘जय जवान, जय किसान’चा संदेश देणारे शास्त्रीजींचे राष्ट्रप्रेम आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाला अनंतलाल चौधरी, जय आबड, विकेश पानघाटे, वंदना आवारी, शामा तोटावार, मोवाडे, अशोक पांडे, प्रमोद लोणारे, अनिल ठाकूरवार, पांडुरंग बत्तुलवार, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, राजू अंकतवार, नीलिमा काळे, पांडुरंग पंडिले, संदीप बोथरा, सुनील इंदुवामन ठाकरे, सुनील वरारकर, शरद मंथनवार, वंदना धगडी, सविता रासेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. गांधीजींच्या अहिंसेचा संदेश आणि शास्त्रीजींच्या राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.