Latest News

Latest News
Loading...

वीतभर जागेसाठी आईलाच मारहाण; सुनेने दिराला फेकून मारली वीट!


प्रशांत चंदनखेडे वणी :-

घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या जागेवरून सुरू झालेला वाद रक्ताच्या नात्यांतील संघर्षापर्यंत पोहोचल्याची घटना पुनवट येथे घडली. घराचे बांधकाम करण्यावरून मोठ्या मुलाने जन्मदात्या आईला थापडाबुक्क्यांनी मारहाण केली, तर सुनेने दिराला वीट फेकून मारली. या घटनेत ७० वर्षीय आई आणि तिचा लहान मुलगा जखमी झाला आहे.

शिरपूर पोलिस ठाण्यात ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पुनवट येथील लक्ष्मीबाई रामाजी पचारे (७०) या मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मोठा मुलगा एकनाथ रामाजी पचारे (५५) हा त्यांच्या घराशेजारी राहतो. लक्ष्मीबाई यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने जागेच्या मुद्द्यावरून मोठा मुलगा त्यांच्याशी वारंवार वाद घालत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास लक्ष्मीबाई यांचा लहान मुलगा सुभाष रामाजी पचारे (५०) हा आईच्या घराचे बांधकाम करून देत होता. त्यावेळी मोठी सून मंजुषा एकनाथ पचारे (४५) हिने ही जागा आमची आहे, असे म्हणत बांधकाम करण्यास विरोध केला. त्यावर लक्ष्मीबाई यांनी तीन फूट जागा सोडून बांधकाम करणार असल्याचे सांगितले.

मात्र, या मुद्द्यावरून वाद वाढला. मोठ्या सुनेने लक्ष्मीबाई आणि सुभाष यांना शिवीगाळ केली, तर मोठ्या मुलाने आईला थापडाबुक्क्यांनी मारहाण केली. यात लक्ष्मीबाई यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. त्याचवेळी मंजुषा हिने सुभाष याला येथे येऊ नको, असे म्हणत वीट फेकून मारली. तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घर आणि जमिनीच्या हक्कावरून कुटुंबांमध्ये निर्माण होणारे वाद अनेकदा कटुतेचे रूप घेतात. पुनवट येथील घटनेतही घराच्या बांधकामासाठी जागा सोडण्याच्या मुद्द्यावरून आई आणि तिच्या दोन मुलांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.

विशेष म्हणजे, जागेच्या वादातून भावाचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच आता घराच्या बांधकामावरून आई आणि भावालाच मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वीतभर जागेसाठी रक्ताच्या नात्यांमध्ये निर्माण होणारा संघर्ष समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

या प्रकरणी लक्ष्मीबाई पचारे यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून, त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सून व मुलावर बीएनएसच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि घटनेची पुढील माहिती पोलिस तपासातून स्पष्ट होईल.

No comments:

Powered by Blogger.