Latest News

Latest News
Loading...

वैर जमिनीशी, घाव पिकावर! भुरकीत पाच एकर पऱ्हाटीच्या नुकसानीची तक्रार


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शेतीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन वादाचे गंभीर पडसाद उमटले असून विकृत मानसिकतेतून शेतातील उभे पिक नष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भुरकी शिवारात समोर आला आहे. गट क्रमांक ८२ मधील सुमारे पाच एकर क्षेत्रावरील पऱ्हाटीच्या पिकावर रात्रीच्या वेळी तणनाशक फवारून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सूडबुद्धीतून केलेल्या या प्रकारामुळे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करत सुनंदा भास्कर मेश्राम यांनी वणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, भुरकी शिवारातील वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरून सुनंदा मेश्राम यांच्या कुटुंबाचा त्यांचे नंदई चक्रधर वारलू मंगाम आणि त्याच्या मुलांसोबत वाद सुरू आहे. हे प्रकरण वणी येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, १३ जुलै २०२६ रोजी न्यायालयाने गट क्रमांक ८२ मधील चार हेक्टर ९२ आर जमिनीबाबत आदेश दिला होता. दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत तक्रारदाराच्या मालकी हक्काला व ताब्याला अडथळा आणू नये, तसेच गैरअर्जदारांना जमिनीत प्रवेश करण्याबाबत निर्बंध घालण्यात आल्याचे सुनंदा मेश्राम यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार त्यांचे कुटुंबीय शेती करीत होते

७ ऑक्टोबर रोजी सकाळी शेताची देखरेख करणाऱ्या नानाजी मेश्राम यांनी त्यांना फोन करून गट क्रमांक ८२ मधील सुमारे पाच एकर पऱ्हाटीच्या पिकावर तणनाशक फवारल्याने पीक खराब झाल्याची माहिती दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर तक्रारदारांचे नातेवाईक मोहन मेश्राम आणि जावई संदीप मुत्तलवार यांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी नानाजी मेश्राम आणि चंदू लांबट यांनी ६ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे ११ वाजता अजय चक्रधर मंगाम आणि त्याचा एक अनोळखी मित्र शेतात आल्याचे सांगितले.

शेताची पाहणी केल्यानंतर तणनाशकाच्या फवारणीमुळे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या घटनेचे फोटोही काढण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादात पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप समोर आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयीन आदेश असताना शेतात अनधिकृत प्रवेश करून पिकावर तणनाशक फवारल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. मात्र, या आरोपांची सत्यता आणि नुकसानीचे नेमके स्वरूप तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

सुनंदा मेश्राम यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतल्याची माहिती आहे. शेतातील पिकाचे नुकसान नेमके कसे झाले, त्यामागे कोणाची भूमिका आहे आणि तक्रारीतील आरोपांना कोणते पुरावे मिळतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.