प्रशांत चंदनखेडे वणी :-
नांदेपेरा–शेलू आणि नांदेपेरा–रांगणा या प्रमुख मार्गांची झालेली दुरवस्था, जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे आणि त्यामुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका, याविरोधात मनसे व शेलू ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाचा अखेर प्रशासनाला दणका बसला. ७ ऑक्टोबर रोजी आंदोलन सुरू होताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत नांदेपेरा–शेलू रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. तसेच रस्ता नूतनीकरणाची प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्याचे लेखी आश्वासनही आंदोलकांना देण्यात आले.
या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने विद्यार्थी, महिला, रुग्ण, शेतकरी आणि दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असतानाही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते.
यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र गावातील एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यानंतरही महिनाभर उलटून गेला; मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली.
मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाला ७ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको व तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
मनसे व ग्रामस्थांचे आंदोलन सुरू होताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता अनंत घोपे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलकांशी चर्चा करून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. तसेच रस्ता नूतनीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले.
वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नासाठी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मनसेने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे अखेर प्रशासनाला हालचाल करावी लागली. दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने शेलू, नांदेपेरा आणि रांगणा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
“प्रशासनाने दिलेला शब्द न पाळल्यामुळेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. जनतेच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी मनसे सदैव रस्त्यावर उतरेल. आता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आमचे यावर पूर्ण लक्ष राहील.”
— फाल्गुन गोहोकार, तालुकाध्यक्ष, मनसे वणी

No comments: