प्रशांत चंदनखेडे वणी :-
प्रेमसंबंधाच्या संशयातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना मोहदा येथे ५ ऑक्टोबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. दुकानात बसलेल्या तरुणाला खाली पाडून दगडाने डोक्यावर वार करण्यात आले, तर बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. याच घटनेदरम्यान संबंधित व्यक्तीने स्वतःच्या पत्नीलाही काठीने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली.
पोलिसांत दिलेल्या बयानानुसार, मनोज अरुण हटवार (वय २९, रा. मोहदा) हा गिट्टी क्रेशरवर पीसी ऑपरेटर म्हणून काम करतो. ५ ऑक्टोबर रोजी सुटी असल्याने तो सायंकाळी मोहदा येथील राजकुमार यादव यांच्या दुकानात बसला होता. त्यावेळी अजय अनिल तलांडे (वय २७, रा. मोहदा) तेथे आला. संशयातून वाद घालत त्याने मनोजला खाली पाडून जवळ पडलेला दगड त्याच्या डोक्यावर मारला. तसेच उजव्या डोळ्यावर बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मनोज हटवार हा जमखी झाला.
दरम्यान, अजय याने पत्नीलाही काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडणाचा आवाज ऐकून गावातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी मध्यस्थी करून दोघांची सुटका केली आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
जखमींचे बयान आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

No comments: