स्मशानभूमीकडे जाण्यासाठी शेतातून रस्ता मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात ७० वर्षीय शेतमजुराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे घडली. ग्रामपंचायतीतील तक्रारीच्या चौकशीदरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दिगांबर गणपत आत्राम (वय ७०, रा. चिंचाळा) हे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या शिपायाने त्यांना विस्तार अधिकारी चौकशीसाठी बोलावत असल्याचे सांगितले. त्यानुसार ते ग्रामपंचायत कार्यालयात गेले. तेथे विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रार अर्जाची चौकशी झाल्याचे सांगून ते मारेगावकडे निघून गेले.
यानंतर ग्रामपंचायत सचिवांसोबत बोलणी झाल्यावर दिगांबर आत्राम हे घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी सागर महादेव इंगोले (वय ३०), मधु महादेव इंगोले (वय ३२), महादेव पुजाराम इंगोले (वय ७०) आणि मुरलीधर भट्ट (वय ७२, सर्व रा. चिंचाळा) यांनी त्यांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठी शेतातून रस्ता का मागत आहात, असा जाब विचारत जातीवाचक शिविगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी सागर इंगोले यांनी कॉलर पकडली, तर महादेव इंगोले यांनी त्यांना धरून ठेवल्याचा आरोप आहे. मधु इंगोले आणि मुरलीधर भट्ट यांनी वेळूच्या काठीने मारहाण करून जखमी केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. भांडण सुरू असताना गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. मात्र, आरोपींनी यानंतर उपोषणाला बसल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या दिगांबर आत्राम यांनी उपचार घेतल्यानंतर ८ ऑक्टोबरला मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे करीत आहेत. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मागणीवरून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण झाल्याच्या या आरोपांमुळे चिंचाळा गावातील वाद आता पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे.

No comments: