एसटीच्या प्रवासी भाड्यात झालेल्या वाढीनंतर आता खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीटदरांनीही उसळी घेतली आहे. वणीवरून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाड्याचा भार सहन करावा लागत असून, श्री साई आणि धनश्री ट्रॅव्हल्सच्या तिकीटदरांत २० रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम असून, वाढत्या प्रवासखर्चामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात दोनदा वाढ केली. परिणामी, वणी ते नागपूर प्रवासासाठी लालपरीचे भाडे सुमारे २६२ ते २६५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. एसटीचा प्रवास महागल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडे वळणाऱ्या प्रवाशांनाही आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
वणी-नागपूर मार्गावर धावणाऱ्या धनश्री आणि श्री साई ट्रॅव्हल्सने सुरुवातीला तिकिटात २० रुपयांची, त्यानंतर आणखी १० रुपयांची वाढ केली. पुढे श्री साई ट्रॅव्हल्सने आणखी २० रुपये वाढविल्याने तिकीटदर २५० रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, धनश्री ट्रॅव्हल्सने मात्र २३० रुपयांचा दर बरेच दिवस कायम ठेवल्याने दोन्ही कंपन्यांच्या तिकीटदरांत २० रुपयांचा फरक जाणवला.
खासगी प्रवासी वाहनांच्या वेळा, आरामदायी सुविधा आणि प्रवासातील सोयी यांचा विचार करून अनेक प्रवासी ट्रॅव्हल्सची निवड करतात. धनश्री ट्रॅव्हल्सच्या वेळेचे नियोजन, नवीन आरामदायी गाड्या आणि चालक-वाहकांच्या नम्र वर्तनाबाबत काही प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात असल्याचे सांगण्यात येते.
सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासह प्रवास करण्याचे नियोजन अनेकजण करतात. मात्र, एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्सचे वाढलेले दर पाहता प्रवासखर्चात मोठी भर पडत आहे. त्यात महिलांना ५० टक्के प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आणि रिचार्ज प्रक्रियेचा सामना करावा लागत असल्याने ही बाबही चर्चेत आहे.
एसटीच्या भाडेवाढीनंतर खासगी ट्रॅव्हल्सचे दरही वाढल्याने प्रवाशांसमोर परवडणाऱ्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच मार्गावर वेगवेगळे दर असल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यापूर्वी दरांची खात्री करावी लागत आहे.

No comments: