महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीला नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देत ऐतिहासिक धम्मक्रांती घडवून आणली. विषमता, जातिभेद आणि रूढी-परंपरांच्या बंधनातून मुक्ततेचा मार्ग दाखविणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वणी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने पंचशील ध्वजाजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेच्या माध्यमातून वंचित आणि शोषित समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा संदेश देत त्यांनी लाखो अनुयायांना नवी वैचारिक दिशा दिली. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. नागपूर येथील दीक्षाभूमी या ऐतिहासिक धम्मक्रांतीची साक्षीदार असून, देशभरातून लाखो अनुयायी येथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात.
वणी शहरातही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. शहरातील विविध भागांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तर काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून धम्मक्रांतीचा जागर करण्यात आला.
रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर पंचशील ध्वजांचे ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन महामानवांना अभिवादन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. महिलांनी सुमधुर आवाजात बुद्ध-भीम गीते सादर करून वातावरण धम्ममय केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या समितीचे रेल्वे अभियंता भरवरलाल मीना यांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमधून सामाजिक एकोपा आणि धम्मविचारांची जपणूक होत असल्याचे नमूद करत त्यांनी समितीला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रशांत चंदनखेडे यांनी केले. यावेळी विद्यमान रेल्वे कर्मचारी संतोष गरपाल, गोलू ऊर्फ अविनाश बोरकर, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी लता आवळे, मंजुळा पाटील, माया चंदनखेडे, शशिकला बोरकर, ज्योती गरपाल, रेखा पाझारे, कु. साधना धवन, शोभा भगत यांच्यासह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल चंदनखेडे, मोंटू ऊर्फ शुभम नगराळे तसेच समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments: