Latest News

Latest News
Loading...

शिरपूर पोलिसांचा दुहेरी दणका! ‘तोत्या’ची तडीपारी, १३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून जेरबंद


प्रशांत चंदनखेडे वणी :-

चोरी, घरफोडी आणि अवैध दारूविक्रीच्या प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई, तर सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या गंभीर प्रकरणात तब्बल १३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक! शिरपूर पोलिसांनी केलेल्या या दुहेरी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे.

सराईत ‘तोत्या’ला तालुक्याबाहेरचा रस्ता
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी आणि अवैध दारूविक्री करणारा शेख आशिक उर्फ तोत्या शेख इब्राहीम (वय ३५, रा. कुरई, ता. वणी) याच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने त्याला वणी व मारेगाव तालुक्यांतून तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१३ वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर उत्तर प्रदेशातून अटक
दुसऱ्या कारवाईत शिरपूर पोलिसांनी २०१३ मध्ये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक केली. निलजई (डब्ल्यूसीएल) परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात सलमान खान समशाद खान पठाण (वय ३५, रा. उत्तर प्रदेश) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

फरार आरोपींच्या शोधासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर केला. पोस्ट ऑफिसच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सैनी येथून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुल्हाणे, पोलीस हवालदार सुनील दुबे, अजय वाभिटकर, पोलीस शिपाई किरण दासरवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे आणि होमगार्ड मोहन घागी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

एका बाजूला सराईत गुन्हेगारावर तडीपारीचा बडगा, तर दुसऱ्या बाजूला दशकाहून अधिक काळ फरार असलेल्या आरोपीला राज्याबाहेरून अटक—शिरपूर पोलिसांच्या या दुहेरी कारवाईने गुन्हेगारांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट केले आहे.

No comments:

Powered by Blogger.