Latest News

Latest News
Loading...

वणीत बिर्याणी हॉटेलवर एलसीबीचा छापा; ६६ किलो संशयित गोवंशीय मांस जप्त!


प्रशांत चंदनखेडे वणी :-

बिर्याणी आणि खाद्यपदार्थांच्या नावाखाली नेमके कोणते मांस ग्राहकांना वाढले जात आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी कारवाई वणी शहरात उघडकीस आली आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील पाच हॉटेलवर धाड टाकली. त्यापैकी तीन हॉटेलमध्ये कथित गोवंशीय मांस आढळले. या कारवाईत एकूण ६६ किलो मांस (किंमत अंदाजे १९ हजार ८०० रुपये) जप्त करण्यात आले. तसेच संबंधित हॉटेल चालकांविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

१८ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोहीम राबविली. सुजाता टॉकीजसमोरील हॉटेल मदिना, एकतानगर येथील सुल्तान बिर्याणी आणि ताज बिर्याणी येथे तपासणीदरम्यान मांस आढळले.

हॉटेल मदिनामध्ये फ्रिजमध्ये १८ किलो आणि प्लास्टिकच्या टोपलीत २० किलो, असे एकूण ३८ किलो मांस मिळाले. त्याची अंदाजित किंमत ११ हजार ४०० रुपये आहे. सुल्तान बिर्याणीच्या स्वयंपाकघरात पाच किलो कच्चे तर चार किलो कुकरमध्ये शिजवलेले मांस आढळले. तेथे आढळलेल्या एकूण नऊ किलो मांसाची किंमत दोन हजार ७०० रुपये एवढी आहे. तर ताज बिर्याणी हॉटेलमध्ये १९ किलो संशयित मांस मिळाले असून, त्याची किंमत पाच हजार ७०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणांत हॉटेल मदिनाचे चालक हबीब खान बिस्मिल्ला खान, सुल्तान बिर्याणीचे चालक मोहम्मद सिद्दीक हाजी हबीब रंगरेज आणि ताज बिर्याणीचे चालक साजिद खान शमशेर खान यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

हॉटेलचे पंचनामे करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रयोगशाळा तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. नाशवंत मांसाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेचे सहकार्य घेण्यात आले आहे. जप्त मांसाचे स्वरूप प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होणार असल्याने, तपास पूर्ण होण्यापूर्वी त्याबाबत अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही.

शहरातील एकूण पाच हॉटेलची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन ठिकाणी संशयित मांस आढळल्याने हॉटेलमधील मांसाचा साठा, त्याचा स्रोत आणि विक्रीच्या पद्धतींबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, गजानन राजमल्लु, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, सागर इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, अजय डोळे, सुधिर पिदूरकर तथा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.

६६ किलो मांसाची जप्ती आणि तीन स्वतंत्र गुन्ह्यांमुळे वणीतील हॉटेल व्यवसायात चर्चेला उधाण आले आहे. आता प्रयोगशाळेचा अहवाल आणि पुढील तपासातून या प्रकरणातील महत्त्वाचे तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.

No comments:

Powered by Blogger.