वणी शहरातील शास्त्रीनगर परिसरात ११ वर्षाच्या मुलासोबत कोजागिरीच्या जेवणासाठी जात असलेल्या ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्त्यात अडवून मुलासमोरच शरीराच्या संवेदनशील भागाला स्पर्श केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. संबंधित कृत्याला विरोध करताच आरोपीने शिवीगाळ केली आणि दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने म्हटले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने २५ ऑक्टोबर रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिला आपल्या ११ वर्षीय मुलासोबत शास्त्रीनगर येथील परिचित व्यक्तीच्या घरी कोजागिरीच्या जेवणासाठी जात होती. दरम्यान, ती परिसरातील एका किराणा दुकानासमोर काही अंतरावर पोहोचली असता, जितेंद्र कोल्हे याने तिच्या मुलाला उद्देशून काही विचारणा केली. त्यानंतर तो महिलेच्या समोर आला आणि मुलासमक्ष तिच्या खासगी अवयवांना स्पर्श केल्याचा आरोप तिने केला आहे.
या प्रकारामुळे महिलेला लज्जा वाटली तसेच छातीत दुखू लागल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. या अश्लील कृत्याने संतप्त झालेल्या महिलेने नंतर संबंधित व्यक्तीला चापट मारून विरोध केला.
महिलेने विरोध केल्यानंतर संबंधित व्यक्तीने तिला मारण्यासाठी दगड उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार पाहून तिचा मुलगा घाबरून रडू लागला. त्यानंतर संबंधित व्यक्ती शिवीगाळ करत तेथून घरी गेल्याचे महिलेने सांगितले.
नंतर महिलेने त्याच्या घरी जाऊन आपल्यासोबत असे का केले, अशी विचारणा केली असता त्याने पुन्हा शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यानंतर तिने आपल्या बहिणीच्या मुलाला फोन करून घटनेची माहिती दिली. तो घटनास्थळी आल्यानंतर त्यालाही शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर महिला आपल्या घराकडे गेली आणि घराजवळ राहणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्याच्यासोबत वणी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या जबाबात संपूर्ण घटनाक्रम नमूद केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जितेंद्र कोल्हे वय अंदाजे ४५ वर्षे रा. मैलगड्डा जवळ, शास्त्री नगर याच्यावर बीएनएसच्या कलम ७५(१), ३५१(२),(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि घटनेची नेमकी पार्श्वभूमी पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. घटनेचा पुढील ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

No comments: