प्रशांत चंदनखेडे वणी :-
गुप्तधन शोधण्यासाठी पूजाविधी आणि जमिनीत खोदकाम सुरु असतांना गावकऱ्यांना त्याची चाहूल लागली. गावकऱ्यांनी त्याठिकाणी धडक देत हा प्रकार उधळून लावला. गावकरी घटनास्थळी पोहचल्यानंतर गुप्तधन शोधणाऱ्या टोळीतील काही जण सुसाट पळाले, तर दोन जण गावकऱ्यांच्या हाती लागले. गावकऱ्यांनी दोघांनाही पकडून ठेवले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांना ताब्यात घेतले. गुप्तधन शोधणाऱ्या या टोळीत एकूण सात जणांचा समावेश असल्याचे नंतर पोलीस तपासातून समोर आले. घटनास्थळावरून पसार झालेल्या व्यक्तींचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी आढळून आलेले पूजेचे साहित्य आणि कुदळ व फावड्याच्या साहाय्याने जमिनीत सुरु असलेले खोदकाम, यावरून हा अघोरी प्रकार गुप्तधन शोधण्यासाठीच करण्यात आल्याचा दाट संशय निर्माण झाला असून तसे प्राथमिक तापसातूनही पुढे आले आहे. वणी मुकुटबन मार्गावरील मानकी या गावात २३ ऑक्टोबरला रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
मानकी गावातील एका प्राचीन मंदिराजवळ काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करतांना गावातील तरुणांना आढळल्यानंतर त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी मंदिराजवळ जाऊन बघितले असता तेथे जमिनीत खोदकाम सुरु असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्याठिकाणी पूजाविधी करण्यात आल्याचेही गावकऱ्यांना दिसून आले. गावकरी घटनास्थळी पोहचताच काही जण पळत सुटले, तर दोन जण गावकऱ्यांच्या हाती लागले. त्यापैकी एक जण मानकी येथीलच रहिवाशी असल्याचे समोर आले. मंदिर परिसरात सुरु असलेला हा प्रकार पाहून गावकऱ्यांना गुप्तधन शोधणारी ही टोळी असल्याचा संशय आला. त्यामुळे गावकऱ्यांनी त्या दोघांना धरून ठेवत पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले.
पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांना तेथे आढळून आलेले पूजेचे साहित्य, करण्यात आलेला पूजाविधी, खोदकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि जमिनीत सुरु असलेले खोदकाम, यावरून हा गुप्तधनाचाच प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे गावकऱ्यांनी पकडून ठेवलेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता गुप्तधन शोधण्यासाठीच हा प्रकार करण्यात आल्याचे उघडकीस आले. घटनास्थळावरून पसार झालेले पाच जण घुग्गुस येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्यांचाही कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रामदास निळकंठ दर्वे (४४) रा. मानकी आणि अनिल मारोती बावणे (५६) यांच्या चौकशीतून आणखी काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पसार झालेल्या व्यक्तींची नावे विठ्ठल अतकरे, गणेश नागपुरे, वासुदेव, रंजना कामटकर अशी असून एका अनोळखी व्यक्तीचाही यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
जमिनीत गुप्तधन दडलं असल्याचा अंधविश्वास आणि ते बाहेर काढण्यासाठी रात्रीच्या अंधारात करण्यात येणारी अघोरी पूजा व खोदकाम, यामुळे सहज धनप्राप्तीसाठी अजूनही असे प्रकार सुरु असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

No comments: