कापूस-तुरीच्या पिकांत गांजाची लागवड! शिरपूर पोलिसांनी शेतकऱ्याला केली अटक; १२७ झाडे (१८.५८ किलो) जप्त
कापूस आणि तुरीच्या पिकांच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सैदाबाद परिसरात उघडकीस आला आहे. अवैध गांजा आणि इतर अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान पोलिसांनी कारवाई करत सुखदेव लेतु आत्राम (वय ५०, रा. सैदाबाद) याला ताब्यात घेतले. त्याच्या शेतातून गांजाची १२७ झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे एकूण वजन १८ किलो ५८० ग्रॅम आणि किंमत १ लाख ८५ हजार ८०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २२ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा, ड्रग्ज आणि अन्य अंमली पदार्थांची अवैध लागवड व विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान सैदाबाद येथील सुखदेव आत्राम याने मौजा कायर शिवारातील आपल्या शेतात तुरीच्या आणि कपाशीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
शेतातील काही गांजाची झाडे विक्रीच्या उद्देशाने उपटून ठेवण्यात आली असून, उर्वरित झाडेही तोडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुखदेव आत्राम याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस पथक आणि पंचांच्या उपस्थितीत संबंधित शेताची तपासणी करण्यात आली. या वेळी शेतात गांजाची एकूण १२७ झाडे आढळून आली. पोलिसांनी ही झाडे जप्त केली असून, त्यांचे वजन १८.५८० किलो असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जप्त गांजाची किंमत १ लाख ८५ हजार ८०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोहीम
अवैध गांजाची लागवड, विक्री किंवा इतर अंमली पदार्थांच्या व्यवहारांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी शिरपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाणे, इकबाल शेख, सूरज साबळे, परमेश्वर दराडे, दीपक वाकडे, अनुप फुलुके, विजय फुलुके, प्रफुल नाईक आणि होमगार्ड यांनी पार पाडली.
कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील तपासात गांजाची लागवड आणि कथित विक्रीसंदर्भातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

No comments: