Latest News

Latest News
Loading...

बेपत्ता चिमुकल्याचा नाल्यात आढळला मृतदेह; विविध शंकाकुशंकांना पेव


प्रशांत चंदनखेडे वणी :-

बेपत्ता चिमुकल्याचा अखेर मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही व्ह्रदयद्रावक घटना २२ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून समाजमन हेलावले आहे. चिकू उर्फ चेतन मनोज चांदेकर वय ५ वर्षे असे या घरून बेपत्ता झाल्यानंतर नाल्यात मृतदेह आढळलेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेने विविध चर्चांना उधाण आले असून गावापासून काही किमी अंतरावर असलेल्या नाल्यात चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. 

मारेगाव तालुक्यातील कुंभा या गावात कुटुंबासह राहणाऱ्या मनोज चांदेकर यांचा ५ वर्षांचा मुलगा चेतन हा २१ ऑक्टोबरला सायंकाळी घरून बाहेर पडल्यानंतर घरी परातलाच नाही. गावातील दुर्गादेवीच्या मंडपात मुलगा खेळत असावा असे कुटुंबियांना वाटले. मात्र बराच वेळ होऊनही चिमुकला घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी दुर्गादेवीच्या मंडपात जाऊन बघितले. पण तो तेथे आढळून आला नाही. नंतर त्याचा गावात इतरत्रही शोध घेण्यात आला. परंतु तो कुठेच आढळून न आल्याने वडील काळजीत आले. रात्रभर सर्वत्र शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता न लागल्याने वडिलांच्या काळजाची धड धड वाढली. शेवटी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली.

गावातून पाच वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून चिमुकल्याचा युद्ध पातळीवर शोध घेणे सुरु केले. एसडीपीओ सुरेश दळवे यांच्यासह मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर रानडे यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेत शोधकार्य राबवले. त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथके तयार करून चिमुकल्याचा ठिकठिकाणी शोध घेतला जात होता. तसेच स्थानिक गुन्हे शाखेवरही चिमुकल्याच्या शोधकार्याची जबादारी सोपविण्यात आली होती. वेगवेगळे अँगल तपासून चिमुकल्याचा शोध घेतला जात असतांनाच २२ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील गदाजी बोरी गावाजवळील नाल्यात चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. हा चिमुकला नाल्याच्या पुलाजवळ कसा काय पोहचला आणि तो नाल्यात कसा बुडाला असे विविध प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. 

आई वडिलांच्या काळजाचा तुकडा असलेला चिकू खेळता खेळता अचानक गावातून बेपत्ता झाला आणि नंतर त्याचा नाल्यात बुडालेल्या अवस्थेत मृतदेहच आढळून आल्याने आई वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांच्यावर अक्षरशः दुःखाचा पहाड कोसळला असून हसत्या खेळत्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांचं काळीज फाटलं आहे. व्ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने कुंभा या छोट्याश्या गावासह संपूर्ण तालुका हादरला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून घातपाताचाही संशय व्यक्त होतांना दिसत आहे. असे असले तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असून पोलीस तपासातून या घटनेतील वास्तविकता समोर येणार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.