वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रगतीनगर वसाहतीतील उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी जड वस्तूने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. ओमप्रकाश हरी प्रसाद वय अंदाजे ५० वर्षे असे या खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेकोलि कर्मचाऱ्यांचे क्वार्टर असलेल्या प्रगतीनगर वसाहतीत सब एरिया मॅनेजर कार्यालय आहे. या कार्यालयात रात्रपाळीत कर्तव्य बजावणाऱ्या ओमप्रकाश प्रसाद यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला चढवून त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. वेकोलि कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाचा कर्तव्य बजावताना खून झाल्याने वेकोलि क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रगतीनगर ही वेकोलि कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असलेली मोठी वसाहत आहे. या परिसरात सब एरिया मॅनेजर कार्यालयासह वेकोलिची विविध प्रादेशिक कार्यालये देखील आहेत. सुरक्षेचा चोख बंदोबस्त असतांना या संवेदनशील परिसरात एका सुरक्षा रक्षकाचा खून झाल्याने वेकोलिच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सुरक्षा रक्षकच सुरक्षित नसतील तर वसाहतीत राहणाऱ्या व रात्रपाळीत कोळसाखाणीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचं काय, हे प्रश्न सुरक्षा रक्षकाच्या हत्येनंतर उपस्थित होतांना दिसत आहेत.
ओमप्रकाश प्रसाद यांना अपघातात अपंगत्व आल्यानंतर त्यांचा मुलगाच त्यांना ड्युटीवर सोडायचा आणि आणायला जायचा, असे सांगण्यात येते. शनिवारी कर्तव्यावर आल्यानंतर त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला चढवून त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार केला. जड वस्तूने त्यांचे डोके अक्षरशः ठेचण्यात आल्याने ते जागीच गतप्राण झाले.
सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्यामागील कारण काय, मारेकरी कोण आहेत, जुन्या वादातून सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली की, हल्लेखोरांच्या कामात तो अडसर ठरत होता म्हणून त्याचा काटा काढण्यात आला. किंवा प्रकरण काही वेगळेच आहे, अशा विविध चर्चा आता वेकोलि वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र पोलीस तपासातूनच सत्य परिस्थिती समोर येणार आहे.
सुरक्षा रक्षकाचा खून करणाऱ्या आरोपींना अटक करून खुनाच्या या घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनीही वेगवान तपासचक्रे फिरवून मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरु केले आहे. विविध अँगलने तपास करून पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र खुनाच्या या घटनेने वेकोलि क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.

No comments: