Latest News

Latest News
Loading...

एसआयआर प्रक्रिया थांबवा; वगळलेली मतदारांची नावे पुन्हा जोडा; माकपचे वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रशांत चंदनखेडे वणी :-

विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा दावा करत ही प्रक्रिया थांबवावी आणि चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे तातडीने पुनर्स्थापित करावीत, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वणी तालुका कमिटीने केली आहे.

यासंदर्भात ॲड. कुमार मोहरमपुरी यांच्या नेतृत्वाखाली वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने मतदार हे प्रारूप यादीतून वगळल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होण्याची शक्यता असून, मतदार यादीची प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने राबविण्याची मागणी माकपने केली आहे.

दरम्यान, द इंडियन एक्स्प्रेसच्या २३ सप्टेंबरच्या वृत्ताचा दाखला देत माकपने निवडणूक आयोगाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी दहा महिन्यांत किमान १४ वेळा काही निर्णयांवर लेखी आक्षेप नोंदविल्याचे समोर आले आहे. 

मात्र, निवडणूक आयोगाने या आक्षेपांना निर्णयप्रक्रियेतील मतभेद/सूचना असल्याचे स्पष्ट करत, मागील वर्षभरातील निर्णय एकमताने झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आयोगाची भूमिका आणि माकपने उपस्थित केलेले आक्षेप अशी दोन्ही बाजू लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

निवडणूक आयोगाचे कामकाज अधिक स्वतंत्र, पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने चालावे, तसेच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची पद्धत बदलून त्यात पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या निवड समितीची व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

मतदार यादीतील पात्र नागरिकांचे अधिकार अबाधित ठेवून SIR प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी आणि निवडणूक आयोगावरील जनविश्वास कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका माकपने मांडली आहे.

No comments:

Powered by Blogger.