Latest News

Latest News
Loading...

वणीत गुंडगिरीला पोलिसांचा दणका; मौलाभाई तीन महिन्यांसाठी तडीपार!


प्रशांत चंदनखेडे वणी :-

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वणी पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मोहम्मद जमील उर्फ मौलाभाई शेख एनल्हक (वय २३, रा. राजूर कॉलरी) याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी, वणी यांच्या आदेशानुसार त्याला वणी व मारेगाव तालुक्यांतून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

मोहम्मद जमील हा वणी पोलिसांच्या गुन्हे अभिलेखावरील आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून, त्याच्या वर्तणुकीमुळे सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता.

सण-उत्सवांच्या काळात पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

सध्या सार्वजनिक सण-उत्सवांचे कार्यक्रम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जमील याच्याविरुद्धचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, वणी यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर २ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याची तीन महिन्यांसाठी तडीपारी करण्यात आली.

तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करत त्याला वरोरा हद्दीत त्याचे नातेवाईक व मित्रांकडे सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अवैध शस्त्र प्रकरणासह विविध गुन्ह्यांचा ठपका

मिळालेल्या माहितीनुसार, जमील याच्यावर अवैध शस्त्र बाळगण्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, भाईगिरी तसेच टोळक्याने जाऊन मारहाण करण्यासारख्या प्रकारांमध्ये त्याचा सहभाग असल्याचेही सांगण्यात आले आहे. एका युवकाची फसवणूक करून लाखो रुपयांची रक्कम लुबाडल्याच्या तक्रारीचाही उल्लेख आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी काळात शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सुरेश दळवे आणि ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सण-उत्सवांच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांची करडी नजर असून, सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

No comments:

Powered by Blogger.