प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील रंगनाथ नगर येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार १६ ऑक्टोबरला पहाटे उघडकीस आली. राहुल देविदास डोलरवार वय अंदाजे ३० वर्षे असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून कुटुंबाचा आधार असलेले तरुण आत्मघाती निर्णय घेऊ लागल्याने चिंता निर्माण झाली आहे. रंगनाथ नगर परिसरात (कोंडंणवाडी) आपल्या आईसोबत राहणाऱ्या राहुल डोलरवार या तरुणाने नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वी त्याच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर वृद्ध आईचा तो एकमेव आधार होता. मात्र राहत्या घरी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर वृद्ध आईला मोठा धक्का बसला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी तरुण मुलाने आत्महत्या केल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments: