Latest News

Latest News
Loading...

इलेक्ट्रोपॅथीच्या प्रमाणपत्रावर अ‍ॅलोपॅथीचा उपचार? कथित बोगस डॉक्टरवर कारवाई


प्रशांत चंदनखेडे वणी :-

इलेक्ट्रोपॅथीचे प्रमाणपत्र असतांना अ‍ॅलोपॅथिक औषधे आणि इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून त्याचा वैद्यकीय व्यवसायात अनधिकृतपणे वापर केल्याचा गंभीर प्रकार झरी येथे उघडकीस आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांच्या तक्रारीनुसार, सुकांत कलीपद राय (वय ५३) यांच्या क्लिनिकमधून अ‍ॅलोपॅथिक औषधे व इंजेक्शन्स जप्त करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम, १९६१ च्या कलम ३३(१) आणि ३३(२) अंतर्गत कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे.

तालुक्यात कथित बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या आदेशानुसार, १३ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोग्य विभागाच्या पथकाने झरी येथे तपासणी केली. वैद्यकीय अधीक्षकांचे प्रतिनिधी, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य विस्तार अधिकारी, आयुष सदस्य, आरोग्य सहाय्यक आणि नगरपंचायतीच्या प्रतिनिधींचा पथकात समावेश होता. ठाणेदार मिलिंद सरकटे यांनाही या प्रकरणाबाबत कळविण्यात आले होते.

तक्रारीनुसार, झरी येथील मुख्य मार्गावरील एका इमारतीतील भाड्याच्या दुकानात संबंधित व्यक्ती क्लिनिक चालवत होती. तपासणीदरम्यान त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचा परवाना मागण्यात आला. यावेळी त्याने इलेक्ट्रोपॅथीचे प्रमाणपत्र दाखविल्याचे तक्रारीत नमूद आहे.

संबंधित व्यक्तीकडे इलेक्ट्रोपॅथीचे प्रमाणपत्र असताना क्लिनिकमध्ये अ‍ॅलोपॅथिक औषधे व इंजेक्शन्स आढळल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. ही औषधे वापरण्यासाठी आवश्यक अधिकृत परवाना नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपासणीदरम्यान औषधसाठा, उपचाराच्या चिठ्ठ्या, बिल-पावत्या आणि संबंधित व्यक्तीच्या नावाचा यूपीआय क्यूआर कोड आढळल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. जप्त औषधे व इतर कागदपत्रे पुढील कायदेशीर कारवाईसाठी जोडण्यात आली आहेत. 

वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक पात्रता आणि अधिकृत परवानगी नसताना उपचार केले जात असल्यास रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

महत्त्वाचे : ही बातमी आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीवर आधारित आहे. संबंधित व्यक्तीवरील आरोपांची स्वतंत्र पुष्टी आणि पोलिसांकडून पुढील कारवाईची माहिती उपलब्ध नसल्याने अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होईल.

No comments:

Powered by Blogger.