Latest News

Latest News
Loading...

अवैध विक्रीकरिता मोटारसायकलने दारूची खेप घेऊन जाणाऱ्या दारू तस्कराला अटक


प्रशांत चंदनखेडे वणी :-

अवैध विक्रीसाठी मोटारसायकलवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तरुणाला शिरपूर पोलिसांनी अटक केली. अंकित बावणे (वय २७, रा. शिवणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याजवळून देशी दारूच्या १०० बाटल्या आणि मोटारसायकल असा एकूण ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तालुक्यातील शिवणी गावात २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना शिवणी गावात मोटारसायकलवरून देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गावाजवळ सापळा रचला.

दरम्यान, संशयास्पदरीत्या येणारी एक मोटारसायकल पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी मोटारसायकल थांबवून चालकाची चौकशी आणि वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारूचे १०० पव्वे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी अंकित बावणे याला ताब्यात घेतले.

अवैध विक्रीच्या उद्देशाने विनापरवाना दारूची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी देशी दारूच्या १०० बाटल्या आणि एमएच २९ सीई ३०६५ क्रमांकाची मोटारसायकल जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५४ हजार ५०० रुपये आहे.

ही कारवाई ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अविनाश बनकर, प्रशांत झोड, पोलीस कॉन्स्टेबल दीपक वाकोडे, विजय फुलुके आणि होमगार्ड राहुल कोल्हेकर यांनी केली.

अवैध दारू वाहतुकीविरोधातील या कारवाईमुळे परिसरातील दारू विक्रेत्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.