वणी तालुक्याची जीवनदायिनी मानली जाणारी निर्गुडा नदी कोरडीठाक पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये शेतीसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप हंगामातील पावसाच्या अनियमिततेमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामातील पिके वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर नवरगाव धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडून शेती आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, निर्गुडा नदीची धार पूर्णपणे बंद पडल्याने नदीपात्राचे रूपांतर डबक्यांमध्ये झाले आहे. त्यामुळे वागदरा, मंदर, वारगाव, चारगाव, शिरपूर, शेलू बु., पुरड, पुनवट, नायगाव बु., कवडशी, सावंगी जुनी-नवी, चिंचोली आणि शिवणी या नदीकाठच्या गावांतील शेतकरी अडचणीत आले आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांवर मोठा भरवसा आहे. मात्र, सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अंकुरलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.
खरीपच्या नुकसानीनंतर रब्बीवरही संकट
यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेचा फटका सोयाबीन आणि कापूस पिकांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आधीच कोलमडले आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजा आणि बँकांसह खासगी कर्जाची परतफेड अशा अनेक जबाबदाऱ्यांचा भार शेतकऱ्यांवर आहे. अशा परिस्थितीत रब्बी पिकांना सिंचनाचे पाणी मिळाले नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर
निर्गुडा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, नदीपात्रात पाणी नसल्याने गाय, म्हैस, बैल आणि शेळ्या यांसह हजारो पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच दुग्धव्यवसायालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीसोबतच पशुधन वाचविण्यासाठीही नदीत पाणी सोडणे गरजेचे असल्याचे पिदुरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा
खरीप हंगामातील नुकसानीनंतर रब्बी पिकांच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा. नवरगाव धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याची कार्यवाही तातडीने करून नदीकाठच्या गावांतील शेतपिके आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विजय पिदुरकर यांनी केली आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात आलेली रब्बीची पिके पाण्याअभावी वाया जाऊ नयेत, तसेच मुक्या पशुधनाचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने विलंब न करता योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नदीकाठच्या शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

No comments: