Latest News

Latest News
Loading...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रांगणा-भुरकी बंधाऱ्याच्या कामाला गती; नगराध्यक्षांची प्रत्यक्ष पाहणी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना रांगणा-भुरकी बंधाऱ्याच्या बांधकामाकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. नगराध्यक्ष विद्या आत्राम यांनी प्रत्यक्ष बांधकामस्थळी भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आणि गुणवत्तेचा आढावा घेतला. बंधाऱ्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाण्याची उपलब्धता करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदाराला दिले.

यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, मुख्याधिकारी सचिन गाडे, उपाध्यक्ष राजेश बुग्गेवार तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. पाहणीदरम्यान बांधकामाची सद्यस्थिती, कामाची गुणवत्ता आणि पूर्णत्वाचा कालावधी याबाबत माहिती घेण्यात आली. कामात गुणवत्ता राखण्यासोबतच कोणताही विलंब न करता बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रांगणा-भुरकी बंधारा परिसरातील जलसाठा आणि पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देत कामाचा नियमित आढावा घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

पाणीटंचाईच्या काळात बंधाऱ्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.