अनेक वर्षांपासून शासकीय जमिनीवर निवासी अतिक्रमण करून राहणाऱ्या वणीतील नागरिकांच्या घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. वणी नगर परिषदेतर्फे पात्र लाभार्थ्यांची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून त्यांना निवासी पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे आपल्या घराच्या कायदेशीर हक्काच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय प्रत्यक्षात साकार झाला. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले. वरिष्ठ नेतृत्वाच्या सहकार्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला अखेर गती मिळाली.
वणी येथे आयोजित पट्टे वाटप कार्यक्रमाला आमदार संजय देरकर प्रामुख्याने उपस्थित होते. नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका, उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांमुळे अनेक कुटुंबांच्या मनात आपल्या निवासस्थानाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता होती. घरात अनेक वर्षे वास्तव्य करूनही कायदेशीर हक्काचा पुरावा नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. आता पात्र अतिक्रमणे नियमानुकूल करून निवासी पट्टे मिळाल्याने या कुटुंबांना सुरक्षिततेची भावना आणि स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे. केवळ पट्ट्यांचे वाटप नव्हे, तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला मिळालेला हा दिलासा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
यावेळी नगराध्यक्ष विद्या आत्राम यांनी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे आणि वणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख कामांना गती देण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घराला कायदेशीर हक्काची जोड मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांसाठी हा दिवस दिलासादायक आणि समाधानाचा ठरला.

No comments: