फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या शेजाऱ्याला हटकल्याने त्याने व त्याच्या पत्नीने युवकाला लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना १० नोव्हेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वांजरी या गावात घडली. या मारहाणीत युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याने याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पती पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, वांजरी या गावात राहणारा विनोद तानबा नैताम (३८) हा घरासमोरील रस्त्याने जात असतांना शेजारी राहणारा संतोष काकडे हा रस्त्यावर फटाके फोडत होता. विनोद नैताम याने संतोष काकडे याला रस्त्यावर फटाके फोडू नको, असे म्हटल्यानंतर संतोष हा चांगलाच संतापला आणि विनोदवर प्रचंड भडकला. फटाके फोडण्याच्या कारणावरून नंतर दोघांमध्ये वादाचा भडका उडाला. दोघांमध्ये सुरु असलेल्या वादात संतोषच्या पत्नीनेही उडी घेतली. दिवाळी सारख्या सणाला फटाके फोडू नको म्हणणारा तू कोण, असे म्हणत पती पत्नीने विनोदशी चांगलाच वाद घातला.
फटाके कुठे फोडायचे हे तू आम्हाला शिकवतोस काय, असे रागाने बोलत दोघेही घरात गेले आणि घरातून लोखंडी पाईप आणून विनोदवर हल्ला चढवला. लोखंडी पाईपने विनोदच्या पायावर जोरदार वार केल्याने विनोद गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. त्यानंतर गावातील काही लोकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. लोखंडी पाईपने डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण करण्यात आल्याने विनोदचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. विनोदने झालेल्या मारहाणीबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी संतोष विलास काकडे (३०) व त्याच्या पत्नीवर बीएनएसच्या कलम ११८(२) व ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ कार्यालयीन पोलीस करीत आहेत.

No comments: