Latest News

Latest News
Loading...

निर्गुडा नदीकाठावरील झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मुतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी :-  

शहरातील मोक्षधाम जवळून वाहणाऱ्या निर्गुडा नदीच्या काठावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना १३ नोव्हेंबरला सायंकाळी उघडकीस आली. सूर्यभान तुळशीराम काकडे (४४) रा. मानकी ता. वणी असे मृतकाचे नाव आहे.

मानकी या गावात गुटुंबासह राहणारा हा युवक गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करायचा. तो घराच्या बांधकामाचे ठेके देखील घ्यायचा. सकाळी कामावर गेल्यानंतर सायंकाळी घरी परतणे, हा त्याचा नित्यनियम. मात्र १३ नोव्हेंबरला सकाळी घरून कामावर जाण्यासाठी निघालेला हा युवक सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंब चिंतेत आलं. त्यांनी त्याचा शोधाशोध सुरु केला. त्याचा शोध सुरु असतांनाच मोक्षधाम परिसरातील निर्गुडा नदीच्या काठावर एका झाडाला दुपट्ट्याने गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. मात्र, वेगळाही संशय व्यक्त होत आहे.

कुटुंबाचा प्रमुख आधार असलेला युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. त्याने आत्महत्या केली की, कारण काही वेगळंच आहे, याबाबत आता चर्चा रंगल्या असून कुटुंबाचा प्रमुख आधार असलेल्या युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. युवकाच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. युवकाच्या मृत्यूने कुटुंब पोरकं झालं असून मुलांच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं आहे. सूर्यभान काकडे याच्या पश्च्यात आई वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालातून युवकाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.