क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा, मुख्यमंत्रांना पाठविले मागण्यांचे निवेदन
महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला राज्य शासनाने दिलासा देण्याकरिता गगनाला भिडलेल्या जिवनावश्यक वतुंच्या किंमती कमी कराव्या, या मागणीसह इतर काही मागण्यांना घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती वणी, मारेगाव व झरीच्या वतीने काल २८ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट देऊन शासनाने महिलांचा प्रवासखर्च कमी केला. त्याप्रमाणे गॅस सिलेंडरचे दरही ४०० ते ५०० रुपये करून जनतेला गृहखर्चात दिलासा द्यावा या मागणीसह इतर काही मागण्या उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून महिलांनी केल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट जाहीर केली. शासनाचा हा अतिशय अभिनंदनीय निर्णय आहे. ज्याप्रमाणे महिलांना प्रवास खर्चात दिलासा दिला. त्याचप्रमाणे वाढत्या महागाईतून जनतेला दिलासा देण्याची मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समितीच्या वतीने करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहे. मागील नऊ वर्षात गॅस सिलेंडरच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे. जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांना जशी टिकिट दरात ५० टक्के सूट दिली. तशा गॅस सिलेंडरच्या किंमतीही ५० टक्के कमी करून महागाईने होरपळणाऱ्या जीवांना दिलासा द्यावा.
त्याचप्रमाणे आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर शासनाने कृपादृष्टी करावी. त्यांच्या शेतमालाचा हमीभाव निश्चित करून शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दुप्पट भाव देण्यात यावा, रास्त भाव दुकानातून धान्य देतांना दुजाभाव न करता प्रत्येक लाभार्थ्याला धान्य देण्यात यावे, गरीब व गरजू लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानातून राशन दिले जाते की नाही याचेही निरीक्षण करण्यात यावे, निराधारांच्या मानधनात वाढ करून दर महिन्याला निराधार निधी देण्यात यावा, महाराष्ट्र सरकारने खाजगीकरणाचे धोरण अवलंबून नऊ एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने ७५ हजार शासकीय व निमशासकीय पदांची केलेली भरती रद्द करून शासकीय पद्धतीने नोकर भरती करावी आदी मागण्या राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. या मागण्यांना घेऊन महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती वणी, मारेगाव व झरीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात वणी, गणेशपूर, राजूर, पळसोनी, झरपट, निंबाळा, कळमना येथील महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Comments
Post a Comment