राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला लागलं नादुरुस्तीचं ग्रहण, मार्गात कुठेही नादुरुस्त होतात महामंडळाच्या बसेस
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कधी कुठे बंद पडतील याचा आता नेमच राहिलेला नाही. तांत्रिक बिघाडीमुळे रस्त्यात कुठेही या एसटी बसेस बंद पडतांना दिसतात. नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या या एसटी बसेस रस्त्यात कुठे न कुठे नेहमीच दृष्टीस पडतात. रस्त्यात नादुरुस्त होऊन उभ्या राहणाऱ्या या एसटी बसेस राज्य परिवहन महामंडळाच्या ब्रीद वाक्याचा अर्थच बदलवू लागल्या आहेत. सुलभ प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाकडूनच आता प्रवाशांची गैरसोय होऊ लागल्याने प्रवाशांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसत आहे. बसेसच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. त्यामुळे एसटी बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन त्या मार्गात कुठेही बंद पडतांना दिसतात. डेपो मधून प्रवासाकरिता निघालेली बस काही अंतरावरच नादुरुस्त होऊ लागल्याने एसटी डेपो मधील बसेसच्या देखभाल व दुरुस्तीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी वणी आगारातून नागपूर करिता निघालेल्या एसटी बसचे सावर्ला पार करताच इंजिन गरम होऊ लागले. बसचे इंजिन गरम झाल्याचा वास येत असतांनाही चालकाने वरोरा आगारात बस आणली. एवढेच नाही तर इंजिन तापल्याने कुलन बाहेर फेकण्याचा अवस्थेत असलेली बस चालकाने पुढील प्रवासाकडे रेटण्याचा प्रयत्न केला. पण आनंदवन चौकातच इंजिन पूर्णपणे हिट झाले व बस बंद पडली. कुलन बाहेर फेकल्या गेले, व इंजिन मधून गरम वाफा निघू लागल्या. इंजिनची गॅस्केट जाळल्याचे नंतर चालकाला कळून चुकले. बस ब्रेकडाऊन झाल्याने भर उन्हात प्रवाशांना पर्यायी व्यवस्था होईस्तोर ताटकळत रहावे लागले. या बस मधील काही प्रवाशांना महत्वपूर्ण कामे असल्याने त्यांना नागपूरला वेळेवर पोहचायचे होते. तर काही आजारी प्रवाशांचा रुग्णालयात नंबर लावून असल्याने त्यांना वेळेत दवाखान्यात पोहचायचे होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. एसटी बसेसला लागलेलं हे नादुरुस्तीचं ग्रहण कधी सुटेल हा संताप यावेळी प्रवाशांमधून व्यक्त होतांना दिसला.
उन्हाळा लागल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याने परिवारांनी प्रवासाचे बेत आखले आहेत. मंगल परिणयाचेही सोहळे रंगत असल्याने बाहेर गावी जाणारे प्रवासी वाढले आहेत. नातलगांच्या भेटीगाठी घेण्याकरिताही नागरिकांचा प्रवास सुरु झाल्याने बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून निघाले आहे. त्यातल्यात्यात राज्य सरकारने महिलांना तिकिट दरात ५० टक्के सूट दिल्याने महिला प्रवाशांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. सरकारने महिलांना ५० टक्के प्रवास खर्चात सूट देऊन महिला प्रवाशांची संख्या तर वाढविली. पण आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या नाही. जुन्या व भंगार बसेसवरच आजही प्रवासाची मदार असल्याने प्रवासातील अनिश्चितता कायम आहे. या बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचीही काळजी घेतल्या जात नसल्याने त्या मार्गात कुठेही बंद पडतांना दिसतात. मेकॅनिकल मिस्त्री कडूनही या बसेस मधील तांत्रिक बाबी तपासल्या जात नसल्याने या बसेसमध्ये नेहमी तांत्रिक बिघाड येतांना दिसतो. वणी आगाराला नवीन बसेस न मिळाल्याने येथे बसेसचा तुटवडा दिसून येत आहे. वणी आगाराला बसेसची पूर्तता करण्यात नेहमीच सावत्रपणा दर्शविण्यात आला. त्यामुळे वणी आगाराला जुन्या बसेसची डागडुजी करून त्याच बसेस प्रवासाकरिता पाठवाव्या लागत आहे. प्रवासादरम्यान या बसेस मार्गात कुठे नादुरुस्त होतील, याची प्रवाशांबरोबरच चालक व वाहकालाही काळजी लागलेली असते.
वणी आगारातून नागपूर करिता निघालेल्या एसटी बसचे काही अंतरावरच इंजिन गरम व्हायला लागले. काही तरी जाळल्यागत वास येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये खळबळ सुरु झाली. कुसण्याच्या जवळपास चालकाने बस थांबवून चेक केली. बसच्या चाकांचे लायनर जाम झाले असावे, असे त्याला वाटले. बसचा पिकअपही कमी झाला होता. चालकाने तरीही वरोरा बसस्थानकावर बस आणली. वरोरा बसस्थानकावर बसमध्ये नेमका काय बिघाड झाला, याची खातरजमा न करताच चालकाने पुढील प्रवासाकरिता बस काढली. आनंदवन चौकात बसचे इंजिन पूर्णपणे हिट होऊन बस बंद पडली. इंजिन तापल्याने कुलन बाहेर फेकल्या गेले व इंजिन मधून वाफा निघू लागल्या. बस मधील प्रवाशांना बस नादुरुस्त झाल्याचे सांगून त्यांना खाली उतरविण्यात आले. भर उन्हात त्यांना प्रवासाची पर्यायी व्यवस्था होईस्तोर ताटकळत रहावं लागलं. त्यामुळे प्रवाशांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसला. डेपो मधून प्रवासाकरिता बस पाठविताना बस मधील तांत्रिक बाबी तपासल्या जात नसल्याने त्या मार्गात नादुरुस्त होत असून त्यात प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होतांना दिसत आहे. त्यामुळे बसेसच्या देखभाल व दुरुस्तीकडे आगार प्रमुखांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून होऊ लागली आहे.



No comments: