Latest News

Latest News
Loading...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वणीतही निघणार गौरव यात्रा, आमदार बोदकुरवार यांचा पुढाकार



प्रशांत चंदनखेडे वणी 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे ३० मार्च ते ६ एप्रिल या काळात संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा काढण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत सावरकरांचं असलेलं योगदान नेहमी स्मरणात रहावं या दृष्टीने या गौरव यात्रेचं राज्यभर आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत ५ एप्रिलला वणी शहरातही स्वातंत्र्यवीर सावरकरांची गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात या गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. शासकीय मैदानावरून (पाण्याची टांकी) सायंकाळी ५ वाजता ही गौरव यात्रा निघणार आहे. 

विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले की, भाजप हा हिंदुत्ववादी विचारसरणी मानणारा पक्ष आहे. भाजप हा पक्ष नेहमी हिंदुत्ववादाचा पुरस्कर्ता राहिला आहे. हिंदुत्ववादी अजेंड्यावर कार्य करणारा हा पक्ष हिंदुत्ववादी विचारधारेला अंगिकारणारा आहे. हिंदुत्व जोपासणाऱ्या प्रत्येक  व्यक्तीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श ठेवला पाहिजे. स्वातंत्र्याच्या चळवळीत सावरकरांचं अमूलाग्र योगदान राहिलं आहे. त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हिंदुत्ववादी जनतेच्या नेहमी स्मरणात रहावं या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरवयात्रा काढण्यात येत आहे. या गौरव यात्रेत सजलेल्या रथात स्वातंत्र्यवीर सावरकरांची वेशभूषा साकारली जाणार आहे. त्यांच्या क्रांतिकारी चळवळीचा इतिहास जनतेसमोर साकारला जाणार आहे. त्यांच्या जीवनातील काही पैलू आकर्षक देखाव्यातून जनतेसमोर ठेवले जाणार आहे. गौरव यात्रेच्या निमित्ताने शहरात आकर्षक अशी सजावट करण्यात येणार आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी ही गौरवयात्रा राहणार आहे. ही गौरव यात्रा शहरातील प्रमुख मार्गांनी भ्रमण करीत टिळक चौक येथे पोहचल्यानंतर या यात्रेचा समारोप होईल. समारोपीय कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयी दयाशंकर तिवारी आपले विचार मांडणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग व समर्पणाचा इतिहास जाणून घेण्याकरिता या गौरव यात्रेत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान आमदार बोदकुरवार यांनी केले आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्यवीर असण्याविषयीच प्रश्न उपस्थित केले जातात. त्यांचा नेहमी अपमान केला जातो. ते इंग्रजांचे हस्तक होते, अशाही वावड्या उठविल्या जातात. त्यांना इंग्रज रसद पुरवायचे, हा देखील इतिहास सांगितला जातो. इंग्रजांना त्यांनी लिहून दिलेले माफीनामेही दाखविले जातात. इंग्रजांना माफी मागून सावरकर हे त्यांच्या सेवेत राहिल्याचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडला जातो. सावरकरांबद्दल संभ्रमित करणारा हा खोटा इतिहास खोडून काढण्याकरिता व त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान जनतेला पटवून देण्याकरिता स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा काढून ते स्वातंत्र्यवीर असल्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 







 

No comments:

Powered by Blogger.