Latest News

Latest News
Loading...

विठ्ठलवाडी परिसरातही सिमेंट रस्ते होऊ द्या, रहिवाशांनी आमदारांकडे केली मागणी


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरात गल्लीबोळात सिमेंट रस्ते तयार होत असतांना विठ्ठलवाडी परिसराकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. विठ्ठलवाडी परिसरातील काही भागाला अजूनही सिमेंट रस्ते बांधकामाची प्रतिक्षा लागली आहे. विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी परिसराला लोकप्रतिनिधींकडून नेहमीच सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे. या दोन्ही परिसरातील विकासकामे करण्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आल्याने येथिल नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. शहरात सिमेंट रस्ते बांधण्याचा धडाका सुरु असतांना विठ्ठलवाडी परिसरातील रस्त्यांनाही न्याय द्यावा, या मागणीला घेऊन विठ्ठलवाडी परिसरातील महिला आमदारांच्या निवासस्थानी धडकल्या. विठ्ठलवाडी परिसरातील काही भागातील रस्ते अरुंद व अविकसित असून या रस्त्यांचे काँक्रेटीकरण करण्याची मागणी विठ्ठलवाडी येथील रहिवाशांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

शहरात सध्या सिमेंट रस्ते बांधकामाचा सपाटा सुरु आहे. गल्लीबोळात काँक्रेट रस्ते तयार होऊ लागले आहेत. शहरात जिकडे तिकडे सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरु असतांना विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी परिसराला मात्र सावत्रपणाची वागणूक मिळतांना दिसत आहे. या दोन्ही परिसरातील विकासकामांकडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने येथिल रहिवाशांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. विठ्ठलवाडी परिसरातील पाचभाई यांच्या घरापासून तर सतीश मुकलवार यांच्या घरापर्यंत तथा हनुमान मंदिर ते झाडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता अरुंद व अविकसित असून या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे डोंगे यांच्या घरापासून तर कुबडे यांच्या घरापर्यंतचा रस्ताही काँक्रेटीकरणाच्या सौंदर्यात नटण्याची वाट बघत आहे. या रस्त्यांचं रूप खुलविण्याकडे कारभारी लक्षच द्यायला तयार नसल्याने येथील रस्त्यांना अद्याप नवसंजीवनी मिळाली नाही. विकासकामांच्या आराखड्यात विठ्ठलवाडीचाही समावेश करा, ही उद्वीग्नता आता विठ्ठलवाडी येथील रहिवाशांमधून व्यक्त होऊ लागली आहे. शहरात सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचा धडाका सुरु असताना विठ्ठलवाडी येथील रस्त्यांवरही दृष्टिक्षेप टाकावा या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्ते गणेश जुनगरी यांच्या नेतृत्वात परिसरातील महिला व पुरुष आमदारांच्या निवासस्थानी धडकले. येथील रहिवाशांनी आमदारांना निवेदन देऊन विठ्ठलवाडी येथील रस्त्यांचे काँक्रेटीकरण करण्याची मागणी केली. 
निवेदनावर सूर्यभान चिडे, विमा चिडे, गणेश जुनघरे, नितीन जुनघरे, शैलेश जुनघरे, सतीश मुकलवार, तुकाराम क्षिरसागर, चंदन राजूरकर, देवाळकर, प्रतिभा पोटे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

गौरकार कॉलनी परिसरही विकासकामांपासून कोसोदूर राहिला आहे. या परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. २० ते २५ वर्षांपासून या ठिकाणि सिमेंट रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. पुरुषोत्तम ठेंगणे नगरसेवक असतांना बांधण्यात आलेल्या नाल्यांकडे नंतर लक्षच देण्यात आले नाही. या नाल्यांचा उतार योग्यरीत्या काढण्यात न आल्याने नाल्यांमधून पूर्णपणे पाणी वाहतांना दिसत नाही. नाल्यांमध्येच पाणी साचून राहत असल्याने  या नाल्या ठिकठिकाणी तुंबलेल्या पाहायला मिळतात. या नाल्या आता ठिकठिकाणी फुटल्या देखील आहेत. या नाल्या आता नूतनीकरणाची वाट बघत आहे. भूमिगत गटार योजना या परिसरात कधी राबविलीच गेली नाही. विकसनशील परिसराचा कर येथील नागरिकांकडून वसूल केला जातो. पण विकासकामे करण्याकडे नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचं कायम दुर्लक्ष होतांना दिसत आहे. गौरकार कॉलनी परिसरात विकासकामे करायचीच नाही, असा ठाम निश्चयच लोकप्रतिनिधी व नगर पालिकेने केल्याचे दिसून येत आहे. एसीबी लॉन मार्गे विठ्ठलवाडी परिसराकडे येणाऱ्या रस्त्याचे तीन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. पण तो रस्ता केवळ पाचभाई यांच्या चक्की पर्यंतच बांधण्यात आला. कारण तेथून गौरकार कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर डांबर टाकायला विकासनिधीच उरला नाही. मागील कित्येक वर्षांपासून गौरकार कॉलनीकडे येणारा हा मुख्य रस्ता डांबरीकरणाची आस लावून बसला आहे. पण बॉस मात्र विकासकामांच्या आराखड्यात या रस्त्याचा समावेशच करायला तयार नाही. येथील नागरिकांचा संयम त्यांची लाचारी बनला आहे. त्यामुळे हा परिसर विकासाच्या बाबतीत मागासला आहे. आता येथील नागरिकांच्या तोंडातून शब्द फुटू लागले आहेत. विकासकामे होत नसल्याने ते एकवटू लागले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे रखडलेल्या विकासकामांना घेऊन येथील नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 

No comments:

Powered by Blogger.