शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असतानाच नळाच्या पाण्यात आढळल्या जंतू व अळ्या
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नगर पालिका प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाही. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांचं आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. नदीतून पाईपलाईन द्वारे येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण न करताच शहरात पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नळाद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. आता तर नळाच्या पाण्यामध्ये चक्क अळ्या आणि जंतू येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नळाच्या पाण्यात आलेले जंतू व अळ्या गौरकार कॉलनी येथिल एका दक्ष युवतीने निदर्शनास आणून दिल्याने नगर पालिकेच्या जलशुद्धीकरणाचं पितळ उघडं पडलं आहे. नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना विषाणूजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. नळाद्वारे गढूळ पाणी व पाण्यात जंतू आढळल्याने नळाचे पाणी पिण्याकरिता वापराने म्हणजे आजाराला आमंत्रण देण्यासारखे असल्याच्या चर्चा आता शहरातुन ऐकायला मिळत आहे.
मागील काही महिन्यांपासून नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. आता तर नळाच्या पाण्यात चक्क जंतू व अळ्या येऊ लागल्याने नळाच्या पाण्याचा वापर करतांना नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नळाच्या पाण्यातून जंतू व अळ्या येत असल्याचे परिसरातील एका युवतीने निदर्शनास आणून दिले आहे. गोर गरीब जनता आजही पिण्याकरिता नळ्याच्याच पाण्याचा वापर करते. स्वयंपाकाकरिता तर नळाचेच पाणी वापरले जाते. परंतु नदीतुन येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण न करताच शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळाच्या पाण्यात जंतू व अळ्या आढळल्याने नागरिकांमध्ये भिती संचारली असून त्यांना आता आपल्या आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. नगर पालिका प्रशासन नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासनाचा दुर्लक्षितपणा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करू लागला आहे. नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा करून नगर पालिका प्रशासन एक प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. पाण्याच्या कराचा भरणा करण्याकरिता नागरिकांवर दबाव आणणारं नगर पालिका प्रशासन शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मात्र तसदी घ्यायला तयार नाही. नळाद्वारे गढूळ पाणी व पाण्यात जंतू येऊ लागल्याने नागरिकांमध्ये नगर पालिकेविषयी कमालीचा असंतोष खदखदत आहे. नगर पालिका प्रशासनाने स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकडे लक्ष न दिल्यास नागरिक तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्र्यात आहेत. नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाने आता कहरच केला आहे. गौरकार कॉलनी (विठ्ठलवाडी) परिसरातील नळाची पाईपलाईन मागील दीड महिन्यापासून फुटलेली असतांना अद्यापही ती दुरुस्त करण्यात आली नाही. फुटलेल्या पाईपलाईन मधून शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. शेकडो लिटर पाणी व्यर्थ जात असतांनाही नगर पालिकेला पाईपलाईन दुरुस्त करण्यात अर्थ दिसत नाही. पाण्याचा योग्य वापर करण्याचे निर्देश देणारी नगर पालिका पाण्याचा अपव्यय होत असतांनाही पाईपलाईन दुरुस्त करायला तयार नाही, याचेच नवल वाटते. फुटलेल्या पाईपलाईन मधून वाहणाऱ्या पाण्यामुळे खुल्या जागेत तलाव साचले आहे. पाईपलाईन दुरुस्तीबाबत येथिल नागरिकांनी नगर पालिकेला अनेकदा कळविले. पण नगर पालिका प्रशासन मात्र नागरिकांच्या तक्रारींची दखलच घ्यायला तयार नसल्याने अजूनही पाण्याची व्यर्थ गंगा वाहत आहे. नगर पालिका प्रशासन सध्या सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे. सोइ सुविधा व समस्यांकडे तर नगर पालिकेचे दुर्लक्ष होतच आहे. पण आता फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याचेही सौजन्य नगर पालिका दाखवायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. यावर्षीचा पावसाळा मध्यम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने शासनाकडून पाण्याच्या वापराबाबत निर्देश देण्यात आले आहे. असे असतांना वणी नगर पालिका हद्दीत हजारो लिटर पाणी व्यर्थ वाहतांना दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment