कास्तकाराला भरदिवसा लुटणाऱ्या आरोपींना काही तासांतच पोलिसांनी केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी येथील जत्रा मैदानाजवळ एका कास्तकाराला तिघांनी मिळून लुटल्याची घटना २५ मार्चला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. वाटमारी करणाऱ्यांमध्ये एका अप प्रवृत्तीच्या युवकासह महिला व एका विधी संघर्षग्रस्त मुलाचाही समावेश आहे. वणी येथील प्रसिद्ध असलेल्या बैल बाजारात आलेला कास्तकार आपल्या दुचाकीने गावाकडे जात असतांना आरोपींनी त्याच्या दुचाकीला लाथ मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम व दुचाकी जबरदस्ती हिसकावून त्यांनी पळ काढला. याबाबत कास्तकाराने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच वाटमारी करणाऱ्या या तिघांनाही अटक केली. अल्पवयीन मुलाला सूचनापत्रावर त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या वाटमारीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर एखाद्याला भरदिवसा लुटण्यापर्यंत या अपप्रवृत्तीच्या लोकांच्या हिंमती वाढल्या आहेत.शहरातील प्रसिद्ध असलेल्या रंगनाथ स्वामी जत्रेला सुरुवात झाली असून जत्रे निमित्त यावर्षीही भव्य असा बैल बाजारही भरला आहे. वणी येथे भरणारा बैल बाजार संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या बैल बाजारात बैल जोडी खरेदी करण्याच्या उद्देशाने आलेल्या सोमनाळा गावातील अमोल श्रीहरी कालेकर (४५) या कास्तकाराला जत्रा मैदानाजवळ तिघांनी मिळून लुटल्याची तक्रार पोलिस स्टेशनला प्राप्त झाली आहे. आमोल कालेकर यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ते दुचाकीने जात असतांना जत्रा मैदान परिसरातील हनुमान मंदिराजवळ एका युवकाने त्यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे तोल जाऊन ते खाली पडले. त्यानंतर एक महिला, एक अल्पवयीन मुलगा व त्या युवकाने त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये व दुचाकी जबरदस्ती हिसकावून तेथून पळ काढला. या माहितीवरून पोलिसांनी जलद तपासचक्रे फिरवून रंगनाथ नगर येथील राहुल उर्फ टिकल्या निळकंठ ठेंगणे याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवून वाटमारी करणाऱ्या अन्य दोघांचीही नावे जाणून घेत दुसऱ्या दिवशी त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. यात प्रेम नगर येथील एक महिला व एका विधी संघर्षग्रस्त मुलाचा समावेश आहे. विधी संघर्षग्रस्त मुलाला सूचनापत्रावर त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. तर राहुल उर्फ टिकल्या व प्रेमनगर येथील महिला आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आरोपींवर भादंविच्या कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या जवळून २५०० रुपये रोख व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment