भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार तर एक जन गंभीर जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
मालवाहू हायवा टीप्परची दुचाकीला जोरदार बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एकाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज 23 मार्चला दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास वणी नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क जवळ घडली. धीरज आत्राम (२८) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संदीप सिडाम (३०) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याला आधी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला चंद्रपूरला रेफर करण्यास सांगितले. हे दोघेही जन वणी तालुक्यातील वांजरी गावातील रहिवासी असून ते काही कामानिमित्त वणीला येत असताना हा अपघात झाला.
विट भट्यावर विट निर्मिती करीता लागणाऱ्या मातीची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (MH 29 BE 1816) दुचाकीला समोरासमोर धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकी पूर्णतः चेंदामेंदा झाली. दुचाकीवरील धीरज आत्राम या विवाहित युवकाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर संदीप सिडाम या अविवाहित तरुणाला जबर मार लागल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. धीरज आत्राम व संदीप सिडाम हे दोनही युवक मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाचे ते नातेवाईक असल्याचे समजते. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धीरज आत्राम या युवकाचा असा हा अकाली मृत्यू झाल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही युवकांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी धीरज आत्राम याला डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment