विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकी संदर्भात पोलिस स्टेशन येथे पार पडली आढावा बैठक
प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणूकीचे सर्वांनाच आकर्षण असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीपासूनच मिरवणुकांची सुरुवात झाली. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीचे अनुकरण करून आज सर्व धर्मिय व महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणूका निघायला लागल्या, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पण आंबेडकरी अनुयायांनी मात्र मिरवणुकीचे जनक असल्याचा आदर्श जपला पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त निघणारी मिरवणूक ही सर्वांसाठी आदर्शवत असली पाहिजे. शांततापूर्ण वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने निघणारी मिरवणूक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीकडे पाहिलं जातं. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढतांना इतरांपुढे कसा आदर्श निर्माण करता येईल, यावर भर द्यावा. मिरवणुकीत सातत्य टिकवून ठेवतानाच मिरवणुकीतून इतरांना बोध घेता येईल, अशा प्रकारची मिरवणूक काढण्याची अपेक्षा आता नव्या पिढीकडून आहे. युवा वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, ही अभिषणास्पद बाब आहे. मिरणुकीचीही जबाबदारी युवा वर्ग उत्तमरीत्या पार पाडतो आहे. असे असले तरी अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळाल्यास त्यात वावगं काय, असे मनोगत वणी उपविभागातील आंबेडकरी चळवळीचा आधारस्तंभ असलेले प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकी संदर्भात पोलिस स्टेशन येथे आज १० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते समाजाचे प्रतिनिधी म्हणून बोलत होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीचा वारसा पुढे चालविणाऱ्या युवा वर्गाला मौलिक मार्गदर्शन व काही सूचनाही केल्या. तसेच त्यांनी पोलिसांनाही मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे अडथळे व अडचणी येणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत सुचविले.
या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय आत्राम, डीबी पथक प्रमुख माधव शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी वणीचा नेहमीच शांत शहर म्हणून उल्लेख केला आहे. येथील जनता ही शांतताप्रिय असून प्रत्येक समाजातील लोकं येथे गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे ते नेहमी म्हणतात. बाबासाहेबांचे विचार हे व्यापक आहेत. बाबासाहेबांच्या विचारांनी जो तोच प्रेरित झालेला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर देश चालतो. अशा या महामानवाची जयंती साजरी करतांना समाजासमोर एक आदर्श उभा राहिला पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढतांना प्रत्येकानेच आपापली जबादारी पार पाडली पाहिजे. मिरवणुकीत कुणीही मद्यप्राशन करणार नाही याची जबादारी मिरवणुकीचे नियोजन करणाऱ्यांनी घेतली पाहिजे. मिरवणूक काढणाऱ्या प्रमुख व्यक्तीला शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मिरवणुकीत हुडदंग करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता आपण स्वतः घ्यावी. पोलिसांचं नेहमीच सहकार्य असतं, तुमचही सहकार्य असू द्या, असं आव्हानही एसडीपो पुज्जलवार यांनी यावेळी केलं.
ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनीही मिरवणुकी संदर्भात काही महत्वपूर्ण सूचना केल्या. मिरवणूक काढणाऱ्या वार्डातील प्रत्येकाने स्वयंसेवक होऊन आपल्या मिरवणुकीचं नेतृत्व करावं. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीत बाहेरच्या व्यक्ती कडून उपद्रव केल्या गेल्यास त्वरित पोलिसांना सांगावं. पण मिरवणुकीतीलच लोकांकडून बेशिस्तपणा होणार नाही, याकडे लक्ष द्यावं. बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक शांततेत पार पडेल, याची सर्वानीच काळजी घ्यावी. बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करा. मिरवणुकीतही जल्लोष करा. पण मिरवणुकीच्या नियोजनाची जबादारी सर्वांनी पार पाडा, असे कळकळीचे आव्हान ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी यावेळी उपस्थित सर्व आंबेडकरी अनुयायांना केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बोलाविण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी यावेळी पोलिस प्रशासनाकडे काही तक्रारीही केल्या. बाबासाहेबांची जयंती साजरी करणाऱ्या प्रत्येक वार्डातील प्रमुखांनी मिरवणूक काढतांना येणाऱ्या अडचणी पोलिस प्रशासनाला सांगितल्या. मिरवणुकीत वाहतुकीचे मोठे अडथळे निर्माण होत असल्याच्या अनेकांच्या यावेळी तक्रारी होत्या. यावर पोलिस प्रशासनाने मिरवणूक काळात त्या मार्गाची वाहतूक बंद ठेवण्याचे आश्वासन दिले. ठाणेदाराने आपण स्वतः रस्त्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले. मिरवणुकीला कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाही, हा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. बैठकीला बाबासाहेबांची जयंती साजरी करणारे प्रत्येकचं वार्डातील प्रमुख व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment