आर.के. कोलडेपोमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्यावर पोलिसांची धाड, सट्टेबाज अफसरसह अन्य एका आरोपीला केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
इंडियन प्रीमियर लिग टी-२० २०२३ हा क्रिकेटचा महासंग्राम सुरु होताच क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजीलाही उधाण आले आहे. क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणारे जिकडे तिकडेच सज्ज झाले आहेत. क्रिकेट बुकींनी कुणालाही संशय येणार नाही, अशा ठिकाणी आपले फंटर बसविले आहेत. क्रिकेट बेटिंगचा हा खेळ सध्या जोरात सुरु असून सट्टेबाजांनी शहरात ठिकठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. अशाच एका क्रिकेट सट्टा अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून दोन सट्टेबाजांना अटक केली आहे. कोळशाच्या व्यापारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असतांना कोलडेपोमध्येच क्रिकेट सट्टा अड्डा सुरु करण्यात आला. कोलडेपोच्या ऑफिसमध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. कोळशाच्या धंद्यात निपुण असलेला व्यक्ती आता क्रिकेट बेटिंगच्या धंद्यात उतरला आहे. आर.के. कोलडेपोमध्येच त्याने क्रिकेट सट्टा अड्डा सुरु केला. कोलडेपोच्या ऑफिसमध्ये क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून कोलडेपोच्या ऑफिसमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा अड्यावर धाड टाकली. तेथे क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतांना दोन सटोरे पोलिसांना रंगेहाथ सापडले. मोबाईलवर क्रिकेट सट्ट्याची लगवाडी घेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून मोबाईल, लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही ७ एप्रिलला रात्री करण्यात आली.
आर.के. कोलडेपोच्या पहिल्या माळ्यावरील ऑफिसमध्ये क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतला जात असल्याची विश्वसनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आर के कोलडेपोच्या ऑफिसमध्ये धाड टाकली असता तेथे आयपीएलच्या सनराईज हैद्राबाद विरुद्ध गुजरात टायटन संघादरम्यान सुरु असलेल्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेतांना दोन सट्टेबाज पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या अफसर खान अनवर खान पठाण (३६) रा. शास्त्री नगर व रिझवान सय्यद रिया सय्यद (२२) रा. मोमीनपुरा यवतमाळ या दोन सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून मोबाईल, लॅपटॉप व १७ हजार ६५० रुपये रोख असा एकूण १ लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या दोनही सट्टेबाजांवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आयपीएलचा हंगाम सुरु होताच क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्यांची धूम पाहायला मिळते. क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळाला जात असल्याने बुकी ठिकठिकाणी आपले फंटर तैनात करतात. क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेण्याकरिता कुणाला संशय येणार नाही अशा जागेची निवड करून त्याठिकाणी ऑनलाईन सट्टा घेतला जातो. परंतु आता क्रिकेट बेटिंग कारण्याऱ्यांवर पोलिसांचीही करडी नजर असून क्रिकेट सट्टा अड्डे चालविणाऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. क्रिकेट सामान्यांवर शहरात कुठेही सट्टा खेळविला जाणार नाही, याची पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा एकप्रकारे वॉच असल्याचे दिसून येत आहे.सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि अमोल मुडे, पोउपनि योगेश रंधे, पोहवा योगेश डगवार, सुनिल खंडागळे, पोना सुधिर पांडे, पोकॉ रजनीकांत मडावी यांनी केली.



No comments: