शहरात भाईगिरीला उधाण, वादविवाद व मारहाणीच्या घटनांमध्ये झाली प्रचंड वाढ
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात सध्या भाईगिरीला उधाण आले आहे. युवकांमध्ये भाईगिरी संचारल्याने शहरात वादविवाद व हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. युवकांचे टोळके कुणाच्याही अंगावर चवताळुन जात त्याला मारहाण करू लागले आहेत. शहरात दादागिरी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. जो तो भाईगिरीचा आव आणून सर्वसाधारण व्यक्तीच्या अंगावर चवताळु लागला आहे. कुणालाही दमदाटी करून मारहाण करण्याच्या घटना शहरात प्रचंड वाढल्या आहेत. शहरात अपप्रवृतीच्या युवकांचे झुंड तयार झाल्याने शहरातील शांतता भंग होऊ लागली आहे. युवकांचे झुंड कधी आपापसात तर कधी कुणाशीही वाद घालून त्यांना मारहाण करतांना दिसत आहे. युवकांचे टोळके शहरात हौदोस घालू लागले आहेत. त्यांना कायदा व पोलिसांची जराही भिती उरली नसल्याचे पहायला मिळत आहे. युवकांचे हे टोळके निर्धास्त झाले असून कुणालाही दमदाटी करून मारहाण करणे ही त्यांची आता सवयच बनली आहे. त्यांच्यावर पोलिसांचा जराही वचक राहिलेला नाही. या वादविवाद व मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. ९ एप्रिलला रात्री अशीच एक युवकांची एकमेकांना मारहाण करण्याची घटना उघडकीस आली आहे. सात ते आठ युवक एकमेकांशी भिडले. डोळ्यात मिरची पावडर झोकून लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. युवकांचे दोन गट एकमेकांशी भिडले व प्रचंड राडा केला. या हाणामारीत तीन युवक जखमी झाले आहेत. त्यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आधी लॉर्ड्स बियरबार येथे या युवकांमध्ये शाब्दिक चकमक व हातापाई झाल्यानंतर शिवाजी पार्कजवळ युवकांचे हे टोळके आपसात भिडले. चित्रपटातील दृश्य पाहून त्याच अवलोकन करू लागल्याने युवावर्ग अनियंत्रित होऊ लागला आहे. शहरात फोफावत असलेली भाईगिरी प्रवृत्ती गुन्हेगारी कारवायांना चालना देऊ लागली आहे. याला वेळीच आवर न घातल्यास शहरातील शांततेला गालबोट लागल्याशिवाय राहणार नाही.
शहरातील लॉर्ड्स बियरबारमध्ये युवकांच्या दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर वाद वाढतच गेला, व त्यांच्यात हातापाई झाली. तेथून एका गटाने काढता पाय घेत दुसऱ्या गटाला शिवाजी पार्क जवळ येण्याचं चॅलेंज केलं. दुसरा गट तेथे पोहचताच सर्व तयारीनिशी असलेल्या पहिल्या गटातील युवकांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर झोकली. त्यानंतर त्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यात तीन युवक जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत राकेश शंकर शेवंतावार (२७) रा. शास्त्रीनगर याने पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीत कुणाल विठ्ठल बुर्रेवार (२८) रा. रामपुरा वार्ड, राजू झगडमवार (३५) रा. शास्त्रीनगर व स्वतः राकेश शंकर शेवंतावार हे या मारहाणीत जखमी झाल्याचे म्हटले आहे. समीर मुन (२७) व अरुण तिरानकर (३०) दोघेही रा. शिवाजी पार्क जवळ हे दोघे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या युवकांमध्ये जुनी खुन्नस असल्याचे बोलले जात आहे. जुन्या वादातूनच हा राडा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तक्रार दाखल केल्यानंतर नेमकं घटनास्थळ कोणतं व तपास कुणी करायचा यात दोन पीएसआयच गोंधळात पडल्याचे दिसून येत होते. आरोपींवर भादंविच्या कमल ३२४,३२६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
शहरात सध्या दमदाटी करून मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. शहरात काही अपप्रवृतीच्या युवकांचे टोळके तयार झाले आहेत. कुणाचा साधा वाद जरी झाला तरी या टोळक्यांचा सहारा घेऊन मारहाण केली जात आहे. झूड प्रवृत्ती वाढू लागल्याने शहरातील शांतता बिघडू लागली आहे. काही दिवसांपूर्वी दीपक चौपाटी परिसरात एका दुकानदाराला युवकाच्या टोळक्याने जबर मारहाण केली होती. त्यानंतर दीपक चौपाटी परिसरातच युवकांच्या दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक उडून दोन गट आमने सामने उभे ठाकले होते. तर शहरात एका कॉलेज तरुणीला एका तरुणाने रस्त्यात गाठून गालावर थापडा मारल्या होत्या. नुकतीच पट्टाचारा नगर येथे शुल्लक कारणावरून एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात एका तरुणीलाही मारहाण करण्यात आली. दीपक चौपाटी, रंगनाथ नगर, सेवा नगर, शास्त्री नगर या परिसरात टोळक्याने मारहाण करण्याच्या घटना सातत्याने घडतांना दिसतात. दीपक चौपाटी परिसर तर गुन्हगारी कारवायांचा हॉसस्पॉट बनला आहे. या परिसरात अपप्रवृतींच्या लोकांचा नेहमीच ठिय्या असतो. काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका दुचाकीस्वाराला मारहाण करून दिवसाढवळ्या लुटल्याची घटना घडली होती. पोलिस स्टेशनमध्ये स्वातंत्र गुन्हे शोध पथक तयार करण्यात आलं असतांनाही गुन्हेगारी कारवाया मात्र कमी झालेल्या नाही. पोलिसांच्या दिमतीला एलसीबी पथकही देण्यात आलं आहे. पोलिसांचा पाहिजे तसा दरारा राहिला नसल्याने अपप्रवृतीच्या युवकांचे मनोबल वाढले आहे. पोलिसांची दोस्ती यारी कारवायांच्या आड येत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. एका महिलेची थेट परप्रांतातून सुटका करण्यात आल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. पण कार्यवाही मात्र कुणावरही झाली नाही. या महिलेला परप्रांतापर्यंत पोहचविण्यात येथीलच काही महिलांचा हात असल्याचेही बोलले जात आहे. पण महिलेची परप्रांतातून सुटका केल्यानंतर या प्रकरणावरच पडदा टाकण्यात आला. गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा न घातल्यास त्यांचे मनसुबे आणखीच वाढतील, व ते शहरातील शातंता भंग करण्याला कारणीभूत ठरतील.
Comments
Post a Comment