ब्राह्मणी फाट्यापासून उकनीकडे वळणाऱ्या रस्त्याचा विकास थांबला, हा रस्ता विकासाची बघतो आहे वाट
प्रशांत चंदनखेडे वणी
खनिज संपत्तीने संपन्न असलेला तालुका म्हणून वणी तालुक्याची ख्याती आहे. गौण खनिजातून शासनाला भरघोस उत्पन्न मिळवून देणारा तालुका म्हणूनही संपूर्ण विदर्भात वणी तालुक्याला ओळखलं जातं. वणी नॉर्थ क्षेत्रात असंख्य कोळसाखानी आहेत. कोळसाखाणीमुळे होणारे प्रदूषण व कोळसा वाहतुकीमुळे होणारी रस्त्यांची दुर्दशा आदी समस्यांच्या निवारणाकरिता वेकोलि कडून खनिज विकास निधी दिला जातो. या खनिज विकास निधीतून खान बाधित क्षेत्रातील समस्यांचे निवारण होणे गरजेचे असतांना हा निधी नेमका कुठे खर्च होतो, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. कोळशाच्या धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने उचांकी गाठली असून खान बाधित रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण व रस्ते विकासाकरिता खनिज विकास निधी खर्च होतांना दिसत नाही.
वणी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. रस्ते विकासाकरिता कोट्यावधींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी ग्रामीण भाग व कोळसाखाणींकडे जाणारे रस्ते आजही आपल्या दुर्दशेवर अश्रू ढाळत आहे. नेते मंडळी रस्त्यांचे प्रश्न तर उचलून धरतात. पण त्याचा पाठपुरावा मात्र करत नाही. केवळ जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता रस्ते बांधकामाच्या मागण्यांची निवेदने दिली जातात. एकदा या नेते मंडळींचा आवाज संबंधित अधिकारी वर्गाच्या कानापर्यंत पोहचला की, झाला विकास. विकासकामांच्या मुद्यांना हात घालून नंतर या मुद्यांकडे दुर्लक्ष का बरं केलं जातं, हेच कळत नाही. ब्राह्मणी फाट्या पासून उकनी कोळसाखानीकडे वळणारा रस्ता काही अंतरावर लुप्त झालेल्या विकासाला शोधत आहे. काही अंतरापर्यंत सोबत आलेला विकास अचानक कुठे थांबला या विवंचनेत हा रस्ता अडकला आहे. रस्त्याच्या एका भागाला काँक्रेटचा पोशाख चढवून विकास कुठे बेपत्ता झाला हा प्रश्न या रस्त्याला पडला आहे. काँक्रेटचे अर्धे वस्त्र चढविलेल्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, त्यामुळे आता या रस्त्यालाही संकोच वाटू लागला आहे. रस्त्याच्या एका बाजूचेच काही अंतरापर्यंत काँक्रेटीकरण करण्यात आल्याने या ठिकाणी नेहमी वाहनांची कोंडी होतांना दिसते. मग ही वाहतूक सुरळीत करण्याकरिता वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक होतांना दिसते. रस्त्याला विकासाने अर्धे वस्त्र चढवून मोठी थट्टा केली आहे. या रस्त्याच्या बांधकामाची मागणी करीत रस्त्यावर उतरलेल्या येथील रहिवाशांनाही रस्त्याच्या अर्धवट बांधकाचा आता त्रास होऊ लागला आहे. येथील रहिवाशांची मनधरणी करण्याकरिता व दिलेला अल्टिमेटम पूर्ण करण्याकरिता हा रस्ता बांधकामाचा देखावा करण्यात आला की काय, ही खुली चर्चा आता नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
ब्राह्मणी फाट्यापासून उकनी कोळसाखानीकडे वळणाऱ्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली होती. हा रस्ता पूर्णतः उखडल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करणे अतिशय जिकरीचे झाले होते. कोळसाखाणीतील रस्त्याप्रमाणे या रस्त्याची अवस्था झाली होती. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे या रस्त्याने सतत धूळ उडायची. एक तर रस्ता पूर्णतः उखडलेला व त्यातही रस्त्यावर सतत धूळ उडत असल्याने नागरिक चांगलेच वैतागले होते. परिणामी त्यांनी रस्ता रोको आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला. नागरिकांनी रस्ता बांधकामाची मागणी रेटून धरली. त्यांच्या मागणीला लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देत वेकोलि प्रशासनाला रस्त्याच्या बांधकामाबाबत अल्टिमेटमच दिला. जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून अल्टिमेटम नुसार सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. पण रस्त्याच्या एका बाजूचेच काही अंतरापर्यंत कॉंक्रेटीकरण करण्यात आले. त्यानंतर या रस्त्याचं बांधकामच थांबविण्यात आलं. मागील काही दिवसांपासून सिमेंट रस्त्याचं बांधकाम पूर्णतः ठप्प पडलं आहे. रस्त्याच्या एकाच बाजूने काँक्रेटीकरण करण्यात आल्याने अनेक दिवसांपासून दुसऱ्या बाजूने कोळशाची वाहतूक सुरु आहे. या रस्त्याने एकेरी वाहतूक सुरु असल्याने कोळसा वाहतुकीच्या वाहनांचा मुख्य मार्गापर्यंत जाम लागतो. या रस्त्यावर वाहतुकीची नेहमी कोंडी होत असल्याने वाहतूक सुरळीत करतांना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होतांना दिसते. या मार्गावर चार कोळसाखानी व एक कोल वॉशरी असल्याने कोळसा वाहतूकीचे शेकडो ट्रक या मार्गाने धावत असतात. तसेच कापसाचे जीनही याच मार्गावर असल्याने कापूस विक्री करिता येणाऱ्या वाहनांची देखील या मार्गाने रेलचेल असते. एकेरी वाहतूक सुरु असल्याने या ठिकाणी नेहमी वाहनांचा जाम लागताना दिसतो. हा जाम सोडविताना वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले जात असतांना या रस्त्याला सोडून विकास कुठे गेला, हेच कळेनासे झाले आहे. काँक्रेटचा अर्धा पोशाख धारण केलेला हा रस्ता विकासाची वाट बघतो आहे. अर्ध्यात थांबलेला विकास कधी पुढे जाईल, ही आस आता या रस्त्याला लागली आहे. काही अंतर चालत नाही तो अदृश्य झालेल्या विकासाची हा रस्ता वाट बघत आहे. विकास कुठे थांबला या विवंचनेत हा रस्ता अडकला आहे. विकासाकडे हा रस्ता नजर लावून बसला आहे. या रस्त्याची विकासाची प्रतिक्षा कधी संपेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment