"स्वनिधी से समृद्धी" योजनेंतर्गत वणी नगर परिषद येथे घेण्यात आले पथविक्रेत्यांचे एक दिवसीय शिबीर
प्रशांत चंदनखेडे वणी
दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत "स्वनिधी से समृद्धी" योजनेच्या माध्यमातून वणी शहरातील पथविक्रेत्यांचे नगर परिषद सभागृहात एक दिवसीय शिबीर घेण्यात आले. वणी नगर परिषद द्वारा आयोजित या शिबिरात केंद्र सरकारच्या आठ महत्वाकांक्षी योजनांची माहिती सांगून पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांची पात्रता तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर या शिबिरात राज्य सरकारच्या विविध सामाजिक व आर्थिक कल्याण योजनांबाबत विस्तृत मार्गदर्शनही करण्यात आले. वणी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी निखिल धुळधर व मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर पार पडले.
सरकारच्या स्वनिधी से समृद्धी योजनेच्या माध्यमातून शहरातील पथविक्रेत्यांना सरकारच्या आर्थिक कल्याण योजनांचा लाभ घेता यावा म्हणून त्यांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत ज्या पथविक्रेत्यांना आर्थिक लाभ मिळाला त्या सर्व पथविक्रेत्यांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करून त्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री श्रम योगी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, एक देश एक राशन कार्ड तसेच रूपे कार्ड, इमारत व इतर बांधकाम योजनेंतर्गत नोंदणीकरण या आठ महत्वाकांक्षी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच पथविक्रेत्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची पात्रता तपासणी देखील करण्यात आली. या शिबिरामध्ये शहरातील बहुतांश बँकांचे शाखा व्यवस्थापक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री जनधन योजना व रूपे कार्ड या तीन महत्वाच्या योजना वित्त विभाग व बँकेशी संबंधित असल्याने या योजनांसंदर्भात बँक व्यवस्थापकांनी या शिबिराच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले. शिबिराचे अध्यक्ष जयंत सोनटक्के यांनी देखील यावेळी पथविक्रेत्यांनी स्वनिर्भर होऊन समृद्ध होण्याकडे वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक असलेले न.प. चे लेखाधिकारी पांडुरंग मांडवकर यांनी "स्वनिधी से समृद्धी" या योजनेसंदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी एकूण ४५ लाभार्थ्यांचा केंद्र शासनाच्या योजनेत समावेश करण्यात आला. त्याचबरोबर पथविक्रेत्यांना परिचय बोर्डाचे वितरणही करण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक अभियानाचेच उत्तम हापसे यांनी केले. सूत्र संचालन शहर अभियान व्यवस्थापक पौर्णिमा शिरभाते यांनी तर आभार प्रदर्शन समुदाय संघटक विनोद मनवर यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता शहर स्तर संघ, सर्व वस्ती स्तर संघ आणि सर्व समूह संसाधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment