काय म्हणावे..! न.प. च्या पाणी पुरवठ्याचे नियोजनच बिघडले, चार ते पाच दिवसांपासून पाणी नाही नळाला
प्रशांत चंदनखेडे वणी
नगर पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे शहरात सध्या पाणी पुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नगर पालिकेकडून होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासियांमधून कमालीचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. मागील काही दिवसांपासून शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नगर पालिका प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली आहे. नगर पालिका प्रशासन पाणी पुरवठ्याबाबत गंभीर नसल्याने शहरवासीयांना दरवेळी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नगर पालिकेचे पाणी पुरवठ्याचे नियोजनच बिघडल्याने शहरवासीयांना कुत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर पालिकेने शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे धोरण आखले आहे. त्यातही ठरलेल्या दिवसांत पाणी पुरवठा होईल याची शाश्वती नसते. पाणी पुरवठा विभागाचे पाईप लाईन दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शहरात पाणी पुरवठ्याची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील काही भागाला पाणी पुरवठाच न झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होतांना दिसत आहे. दैनंदिन वापराकरिताही पाणी न राहिल्याने अनेकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवावे लागत आहे. पिण्याचे पाणी तर शहरवासी विकत घेतातच, पण अनियमित पाणी पुरवठ्यामुळे आता वेळी दरवेळी दैनंदिन वापराकरिताही पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाण्याचा वाढीव कर भरूनही दरवेळी पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नगर पालिका प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे.
नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पाणी पुरवठा विभागावर नियंत्रण न राहिल्याने शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या टीकेचे कारण ठरलेली नगर पालिका नंतर फुटलेल्या पाण्याच्या पाईप लाइनकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे चांगलीच चर्चेत आली. नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात अळ्या व जंतू आढळल्याने शहरवासीयांनी नगर पालिकेवर मोर्चे काढले. त्यानंतर दूषित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता प्रशासकीय अधिकाऱ्यांची शहरातील काही प्रमुख व्यक्तींशी चर्चा झाली. दूषित व अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नगर पालिकेवर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले. अशुद्ध पाणी पुरवठ्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. पण पाणी पुरवठ्यातील अनियमितता मात्र जैसे थेच आहे. शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक पाणी पुरवठा होणाऱ्या दिवसाची चातकासारखी वाट बघत असतात. पण ठरलेल्या दिवशीही नळं न आल्यास नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होतो. दोन दिवस पाणी पुरवावे लागते, त्यातही कमी दाबामुळे नळाला पाणी येत नाही. त्यातल्या त्यात पाणी पुरवठ्याबाबत नेहमी धाकधूक लागलेली असते.
मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील काही भागातील नळच आले नाहीत. त्यामुळे पाण्याअभावी नागरिकांचे मोठे हाल होतांना दिसत आहे. अनियमित पाणी पुरवठ्याची ही समस्या कधी सुटेल, हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. पाणी पुरवठ्याबाबत नेहमी नागरिकांना साशंकता असते. पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाला नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत आहे. नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम नगर पालिका प्रशासन करीत आहे. दरवेळी नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवावे लागत आहे. नगर पालिकेच्या ढेपाळलेल्या कारभाराचा फटका शहरवासीयांना बसत आहे. नगर पालिकेनं आपलं दुर्लक्षित धोरण सुधारावं, ही आगत्याची मागणी शहरवासियांमधून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment