शहरातील रस्त्यांवर दिसत आहे ऑटो चालकांची मनमानी, कार्यवाही केल्यास खणखणतात राजकीय नेत्यांचे फोन
प्रशांत चंदनखेडे वणी
ऑटो चालकांना कुठल्याही प्रकारची शिस्त उरली नसल्याचे एकूणच चित्र वणी शहर व तालुक्यात पाहायला मिळत आहे. ऑटो चालकांच्या बेशिस्तपणामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत असून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांनाही वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑटो चालकांवर कार्यवाही करतांना वाहतूक पोलिसांचाही नाईलाज होतांना दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ऑटो चालकांवर कार्यवाही केल्यास लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक पुढारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एवढेच नाही तर पक्ष कार्यकर्तेही वाहतूक पोलिसांना फोन करून त्यांच्यावर कार्यवाही न करण्याबाबत दबाव आणतांना दिसतात. त्यामुळे वाहतूक पोलिसही ऑटो चालकांना शिस्त लावण्यास धजावतांना दिसत नाही. ऑटो चालकांवर कार्यवाही केली की फोन खणखणतो, ही खंत पोलिस वर्तुळातून व्यक्त होतांना दिसत आहे. ऑटो चालकांना शिस्त लावताना अडथळे आणणारे त्यांचे पाठीराखेच ऑटो चालकांचे मनोबल वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑटो प्रवासी वाहतूक करतांना दिसतात. ग्रामीण भागातला प्रवास खास करून ऑटोनेच केला जातो. शहरातही कुठे जाणे येणे करण्याकरिता ऑटोची सेवा घेतली जाते. ऑटोच्या व्यवसायातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. वयस्क ऑटो चालक आजही नियमांचे पालन करूनच ऑटो चालवितात. रोजी रोटीचे साधन समजून ऑटोचा व्यवसाय करणारे ऑटो चालवितांना पूर्ण खबरदारी घेतात. अनेकांच्या पिढ्या ऑटोच्या व्यवसायातून घडल्या आहेत. ऑटो चालकांना एकेकाळी सन्मानाचे स्थान होते. ज्यावेळी प्रवासाची साधने कमी होती. त्यावेळी ऑटो चालकांनी प्रवाशांच्या प्रवासाची जबाबदारी स्वीकारली. ऑटो चालवितांना सावधानी बाळगणे हे त्यावेळी ऑटो चालक आपलं परम कर्तव्य मानायचे. ऑटोच्या प्रवासाचीही त्यावेळी प्रवाशांना हमी असायची.
पण आता ऑटो चालविण्याची पद्धतच बदलली आहे. अनेक तरुण ऑटो चालक सुसाट व निष्काळजीपणे ऑटो चालवितांना दिसतात. एका हातात ऑटोचे स्टेरिंग तर दुसऱ्या हाताने फोन कानाला लावलेला असतो. वाहनांना कट मारत ऑटो चालविले जातात. मागे पुढे न बघता बिनधास्त कुठीही ऑटो वळविले जातात. अचानक ब्रेक मारून मार्गात कुठेही ऑटो थांबविले जातात. ऑटोत बसलेल्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासस्थळी पोहचवायची जबाबदारी ऑटो चालकाची असते. पण मस्तीत ऑटो चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात आणला जात आहे. ऑटो चालकांची प्रवाशी मिळविण्याची स्पर्धा प्रवाशांचाच जीव धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरू लागली आहे. ऑटो चालकांचे वेगावर नियंत्रण राहिलेले नाही. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरून देखील भरधाव ऑटो चालविले जातात. काही ऑटो चालकांजवळ तर ऑटो चालविण्याचे परवाने देखील नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या एका कार्यवाहीतून समोर आले आहे. ऑटो हा नेहमी नागरिकांच्या प्रवासाचा एक भाग राहिला आहे. ऑटोने प्रवास करण्यावर नागरिकांनी दाखविलेला विश्वास ऑटो चालकांनी सार्थक ठरविला पाहिजे. आणि म्हणूनच ऑटो चालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. ऑटोच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक निष्पाप जीवांचा अपघातात बळी गेला आहे. अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे ऑटो चालकांनी ऑटो चालवितांना संयम बाळगणे गरजेचे आहे.
ऑटो चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. नियमबाह्य पद्धतीने रस्त्यांवर कुठेही ऑटो उभे केले जात आहे. ऑटो चालकांचा बेशिस्तपणा मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा संताप वाढवू लागला आहे. निष्काळजीपणे ऑटो चालविले जात आहे. ऑटो चालकांचे वेगावर नियंत्रण राहिलेले नाही. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरूनही सुसाट ऑटो चालविले जात आहे. वाहतूक पोलिसांनी आधी या ऑटो चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. पण ऑटोवर कार्यवाही करताच त्यांचे पाठीराखे पोलिसांवर दबाव आणू लागल्याने वाहतूक पोलिसांनी ऑटो चालकांना शिस्त लावणेच बंद केल्याचे पहायला मिळत आहे. आता ऑटो चालक निर्धास्त झाले असून त्यांची शहरातील रस्त्यांवर मनमानी सुरु आहे. पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था डळमळू लागली आहे. शहरात वाहतुकीची समस्या जैसे थे झाली आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय, हा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
Comments
Post a Comment